मुंबई : बँकेत गहाण ठेवलेल्या घराची २९ लाखांना विक्री करत प्रॉपर्टी एजंटचीच फसवणूक करण्याचा प्रकार मालाड येथे उघडकीस आला. याप्रकरणी ३९ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिल्यानंतर दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार हे गोरेगाव पश्चिम परिसरात राहत असून प्रॉपर्टी खरेदी-विक्रीची कामे करतात. त्यांच्या तक्रारीनुसार सुरेश बैद याने मालाड पश्चिमेकडील साई झरोका सोसायटीमधील स्वत:चा दुकानाचा गाळा विकायचा आहे, असे त्यांना सांगितले. गाळ्याची किंमत २९ लाख रुपये ठरल्यानंतर १६ जून २०२३ रोजी तक्रारदाराच्या मोठ्या भावाच्या नावे खरेदी करारनामा केला गेला. सुरेशसह प्रमिला बैद आणि प्रियांका बैद हे या गाळ्याचे मालक असल्याचे करारनाम्यात नमूद करण्यात आले होते.
तक्रारदाराने धनादेशाच्या स्वरूपात २९ लाख रुपये आरोपींना दिले. पैसे घेतल्यानंतर गाळ्यातील सामान शिफ्ट करण्यासाठी सुरेशने तक्रारदाराकडे पाच महिन्यांची मुदत मागितली.
मेंटेनन्स बिलही थकीततक्रारदाराने सदर गाळ्याचे शेअर सर्टिफिकेट त्यांच्या नावे करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केला. त्यावेळी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी हा गाळा बँकेत गहाण ठेवण्यात आला असून बैद यांनी त्याचे मेंटेनन्स बिलही थकवल्याचे सांगितले. याबाबत तक्रारदाराने सुरेशला विचारणा केली असता ती प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी त्याने एक महिन्याची वाढीव मुदत मागितली.
नोटीसच प्रसिद्ध झालीएका इंग्रजी वर्तमानपत्रात २२ मार्चला एका बँकेने नोटिसीद्वारे हा गाळा गहाण असल्याने त्याचा ताबा घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने मालाड पोलिसात सुरेश, प्रमिला व प्रियांका यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.