शुश्रूषा रुग्णालयाची खासगी संस्थेला विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 09:53 AM2023-09-25T09:53:19+5:302023-09-25T09:53:38+5:30

विक्रोळीकरांचा पर्याय संपुष्टात?

Sale of nursing hospital to private institution | शुश्रूषा रुग्णालयाची खासगी संस्थेला विक्री

शुश्रूषा रुग्णालयाची खासगी संस्थेला विक्री

googlenewsNext

जयंत होवाळ 

मुंबई : गेली काही वर्षे ‘व्हेंटिलेटर’वर असलेल्या सहकारी तत्त्वावरील विक्रोळीच्या शुश्रूषा रुग्णालयाची  धुगधुगी संपल्यात जमा असून  हे रुग्णालय विकण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. दत्ता मेघे  संस्था विकत घेण्याच्या तयारीत आहे. भागधारकांची संख्या वाढविण्यात आलेले अपयश, मंजूर केलेले २५ कोटी देण्याकडे राज्य सरकारने फिरवलेली पाठ,  कोविडकाळात बसलेला आर्थिक फटका आणि मुंबई पालिकेने थकवलेले आठ कोटी यांमुळे रुग्णालयाला गाशा गुंडाळावा लागत आहे. 

दादर येथील शुश्रूषा रुग्णालय गेली अनेक वर्षे उत्तम सेवा देत आहे. त्याच धर्तीवर  २०१८  मध्ये विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये शुश्रूषा रुग्णालय सुरू केले.  
रमेश तुलसीयानी या गृहस्थांनी २५ कोटींची देणगी दिल्याने रुग्णालयाची आर्थिक गाडी काहीशी  रुळावर आली होती. सहकारी तत्त्वावरील रुग्णालय उभे राहत असताना त्यात लोकसहभागाचे महत्त्व मोठे असते; परंतु लोकसहभाग अर्थात मोठ्या संख्येने भागधारक मिळाले नाहीत. कोरोनाकाळात पालिकेने हे रुग्णालय ताब्यात घेतले होते. २०२१ पासून रुग्णालय बंदच आहे.  

रुग्णालयासाठी २५ कोटी रुपये देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र ते पैसे दिलेच नाहीत. कोरोना काळातील  भाड्यापोटी पालिकेने  फक्त  ९९ लाख ९० हजार रुपये दिले. उर्वरित आठ कोटी दिले नाहीत. पालिकेने रुग्णालय चालवण्यास घ्यावे असा आमचा प्रयत्न होता. मात्र पालिका फारच कमी भाडे देऊ करत होते. सारस्वत बँकेकडून ४० कोटी कर्ज घेतले आहे. परिणामी वाढता तोटा लक्षात घेता रुग्णालय  विकण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे शुश्रूषाच्या संचालक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. नंदकिशोर लाड यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्तांचा फोन हाेता बंद
या संदर्भात अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा मोबाइल बंद असल्याचा संदेश 
येत होता.

सध्या  ज्या संस्थेला रुग्णालय देण्याचा प्रस्ताव आहे, ती संस्था आम्हाला ९० कोटी देणार आहे. शिवाय म्हाडाशी संबंधित बाबीही तीच संस्था हाताळणार आहे. भागधारकांच्या सवलती  आणि ज्या गृहस्थांनी रुग्णालयाला देणगी दिली आहे, त्यांचे रुग्णालयाला दिलेले नावही कायम असेल, असे लाड यांनी सांगितले. 

संस्था ज्या  दरात रुग्णालय विकत घेणार आहे, तो दर पालिकेने दिल्यास  संचालक मंडळ रुग्णालय पालिकेला देईल का, असे विचारले असता, ‘पालिका तेवढा  दर किंवा भाडे देण्यास तयार नाही, त्यांनी सकारात्मकता दाखवली तर विचार होऊ शकतो. अजून आम्ही संबंधित संस्थेशी सामंजस्य करार केलेला नाही,’ असे  उत्तर लाड यांनी दिले. 

 

Web Title: Sale of nursing hospital to private institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.