मुंबई : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने धारावीत छापे टाकले असता पुनर्वापर केलेल्या तेलाची विक्री करणारे रॅकेट मुंबईत सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. हातगाडी धारक, स्टॉलधारक छोट्या रेस्टॉरंट्सकडून असे खाद्यतेल विकले जात असण्याचा संशय असून आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
नियमानुसार दिवसाला ५० लिटर तेलाचा वापर करणाऱ्या अन्न विक्रेत्यांना तीन वेळच खाद्य तेलाचा वापर करता येतो. हा वापर झाल्यानंतर या तेलाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी तेल साबण बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपन्यांना देणे बंधनकारक आहे. तर ५० लिटरपेक्षा कमी तेलाचा वापरणाऱ्यांनी हे तेल खाण्यात येऊ नये याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे.
या नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी करण्यासाठी एफएसएसआयकडून २ ते १७ सप्टेंबर दरम्यान एक मोहीम राबविण्यात आली. अन्नपदार्थ विक्रेत्यांकडून तेल जमा करत साबण बायोडिझेल कंपन्यांना तेल पुरवणाऱ्या धारावीतील दोन कंपन्यांवर एफएसएसआय छापा टाकला. यावेळी पुनर्वापर केलेले तेलच त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते तर जमा केलेले तेल साबण बायोडिझेल कंपन्यांना जात नसल्याची माहिती एफएसएसआयचे उपसंचालक डॉक्टर के. यू. मेधेकर यांनी दिली.
या ठिकाणी उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले. एफएसएसआयच्या कारवाईनुसार केएफसीकडून धारावीतील मे. नूर कंपनीला तर बर्गरकिंग कडून मे. केएनजी कंपनीला तीनदा वापरलेले तेल साबण बायोडिझेल कंपन्यांपर्यंत पोहचत नाही. जमा केलेले खराब तेल मुंबईतील रस्त्यावरील स्टॉलधारक चायनीजवाले हातगाडीवाले यांना विकण्यात येत असल्याचा संशय एफएसएसआयला असल्याचे त्यांनी सांगितले . या संशयानुसार आता एफडीए आणि एफएसएसआयकडून यांची तपासणी केली जाणार आहे.
* घातक का?
खाद्यतेलाचा पुनर्वापर तीनदा करता येतो. त्यानंतरचे तेल खाण्याजोगे नसते. अशा तेलाचा वापर केलेल्या अन्नपदार्थाचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अन्नपदार्थाची विक्री करताना रेस्टॉरंटस स्टॉलवर अन्नपदार्थ खाताना योग्य ती काळजी घ्यावी. नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करावे असे आवाहन एफएसएसआयने केले आहे.
केएफसी तसेच बर्गरकिंगला नोटीस
केएफसी आणि बर्गरकिंग पुनर्वापर केलेले तेल विल्हेवाटीसाठी कंपन्यांना देते मात्र या कंपन्या पुढे तेलाची योग्य विल्हेवाट लावत नसल्याने एफएसएसआयने नोटीस बजावल्या आहेत.