मुंबई : गेल्या वर्षातल्या दुस-या तिमाहीत (एप्रिल ते जून) देशातील सात प्रमुख शहरांमध्ये ६८ हजार ६०० घरांची विक्री झाली होती. कोरोनामुळे लागू झालेले लाँकडाऊन आणि त्यापाठोपाठ दाखल झालेल्या आर्थिक मंदीमुळे घरांच्या विक्रीचा हा डोलारा पूर्णतः कोसळला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये तब्बल ८१ टक्के घट झाली असून यंदा फक्त १२ हजार ७४० घरांचीच विक्री झाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात हे खरेदी विक्री व्यवहार २१ हजार ३६० वरून ३ हजार ६२० इतके कमी झाले आहेत. या प्रदेशातली घट ८३ टक्के आहे.
बांधकाम क्षेत्रातील सल्लागार संस्था असलेल्या अँनराँक प्राँपर्टीजने केलेल्या सर्वेक्षण अहवालातून ही माहिती हाती आली आहे. कोरोना प्रकोपामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप हा मुंबई महानगर क्षेत्रात आहे. त्यानंतरही सात प्रमुख शहरांपैकी सर्वाधिक घरांची विक्री याच प्रदेशात झाल्याची माहिती अँनराँकच्या अनूज पुरी यांनी दिली. या भागात ३ हजार ६२० घरे लाँकडाऊनच्या कालावधीत विकली गेली. त्या खालोखाल बंगळूरू (२९९०) या शहराचा क्रमांक लागतो. डिजिटल माध्यमातून घरांच्या खरेदी विक्रीचे प्रयत्न विकासकांकडून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या तयार असलेल्या घरांना खरेदीदार मिळत नसून बांधकाम सुरू असलेल्या घरांची विक्री कशी करायची असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. त्यामुळे नव्याने कोणताही प्रकल्प सुरू करण्याची हिम्मत विकासकांमध्ये नाही. त्यानंतरही गेल्या काही दिवसांत पुणे आणि कोलकत्ता येथील प्रत्येकी एक आणि बंगळूरू येथे दोन नव्या प्रकल्पांची मुहुर्तमेढ रोवण्यात आली आहे. त्या चार प्रकल्पांमध्ये १३९० घरांची उभारणी होणार आहे. गेल्या वर्षी या कालावधीत सुमारे ६९ हजार नव्या घरांचे बांधकाम सुरू झाले होते. मुंबई महानगर क्षेत्रात एकाही नव्या प्रकल्पाची सुरूवात झालेली नाही, असे हा अहवाल सांगतो.