ऑगस्ट महिन्यात मुंबईत ६,७८४ घरांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:07 AM2021-09-03T04:07:09+5:302021-09-03T04:07:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : यंदाच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत ६ हजार ७८४ घरांची विक्री झाली आहे. २०१९ च्या ऑगस्ट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत ६ हजार ७८४ घरांची विक्री झाली आहे. २०१९ च्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये घरखरेदीत १६ टक्क्यांनी वाढ झाली असल्याने रिअल इस्टेट बाजारात आनंदाचे वातावरण आहे. या घरखरेदीमुळे शासनाच्या तिजोरीत ४०० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यामध्ये चार टक्के महिला घरखरेदीदार आहेत.
जुलै महिन्यातील घर खरेदीपेक्षा ऑगस्टच्या घरखरेदीमध्ये घट झाली असली तरीदेखील रिअल इस्टेट बाजारात आनंदाचे वातावरण आहे. कारण जुलै महिन्यापर्यंतची घर खरेदीची नोंदणी मार्च महिन्यातच करण्याची परवानगी दिल्याने यंदाच्या जुलै महिन्यापर्यंत घर खरेदीमध्ये वाढ दिसून आली. यानंतर आता ऑगस्टमधील घरखरेदीमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत नसूनदेखील घर खरेदीने सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेनंतर रिअल इस्टेट बाजार सावरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यापुढील काळात घर खरेदीचा आलेख कसा राहील हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. घर खरेदीला पुन्हा एकदा चालना मिळावी यासाठी विकासक मुद्रांक शुल्कात सवलत देण्याची मागणी सरकारकडे करीत आहेत. त्यामुळे आता सरकार यावर सकारात्मक प्रतिसाद देईल का याकडे बांधकाम क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया
शिशिर बैजल (अध्यक्ष, नाईट फ्रँक इंडिया) - दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील घर खरेदी वाढली आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने, तसेच लसीकरण प्रक्रिया जोर धरत असल्याने घर खरेदीत वाढ दिसून येत आहे. घरखरेदीचा आलेख असाच राहण्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात.
अशोक मोहनानी (अध्यक्ष, नरेडको) - लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्याने आर्थिक स्थिती सुधारत आहे. मुद्रांक शुल्कात सवलत नसतानाही घर खरेदीत वाढ होणे हे कौतुकास्पद आहे. पुढील काळात घरखरेदीला अशीच चालना मिळेल अशी आशा आहे.