अॅसिडिटीवरील अनेक औषधांची विक्री बंद; रेनिटायडिनमुळे कर्करोगाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 06:29 AM2019-09-30T06:29:12+5:302019-09-30T06:30:10+5:30
औषधांमधील रेनिटायडिन घटक कर्करोगाला पूरकअसल्याची धक्कादायक बाब आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.
मुंबई : औषधांमधील रेनिटायडिन घटक कर्करोगाला पूरकअसल्याची धक्कादायक बाब आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. अॅसिडीटीवर देण्यात येणाऱ्या गोळ्यांमध्ये सर्रास रेनिटायडिन घटकांचा वापर करण्यात येतो. तर प्रत्येक तीन भारतीयांमागे एक भारतीय रेनिटायडीन घटक वापरत असलेल्या गोळ्या घेत आहे. रेनिटायडिन हे अॅसिडिटीवर उपचार म्हणून सर्रास वापरले जाते. रेटँक, बसीलोक, जिनेटॅक, हिस्टॅकसारख्या प्रसिद्ध गोळ्यांमध्ये हा घटक वापरला जात आहे. या रेनिटायडीनमध्ये कर्करोगाला पूरक रसायन (एनडीएमए) असल्याचे आढळले आहे. रेनिटायडीनची औषध विक्री कॅनडा, सिंगापूर आणि बहारिनसारख्या देशांनी बंद करून या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. यूएस फूड अॅण्ड ड्रगच्या पुढाकाराने विक्री बंद करण्यात आली आहे.
भारत सरकारने आता याकरिता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या औषधांच्या पडताळणीसाठी प्रमुख औषध नियंत्रकांकडून त्याबाबत केंद्रीय अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पत्र लिहिण्यात आले आहे. यात रेनिटायडिन औषधाच्या शुद्धतेबाबत विचार करावा,
असे सुचविण्यात आले आहे. रेनिटायडिन औषध, गोळ्यांपासून इंजेक्शन अशा सर्व प्रकारात वापरण्यात येत आहे. तसेच हे एच वर्गवारीत येत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देण्यात येऊ नये, असेही या पत्रातून सूचित करण्यात आले आहे.
केंद्रीय अन्न व औषध प्रशासन (औषध) विभागाच्या अखत्यारीत या औषधाचा वापर येत असल्याने उत्पादक, वितरक यांची पडताळणी करून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलावीत, असे जनरल ड्रग कंट्रोलर डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी म्हटले आहे.
दोष आढळल्यास ते दूर करणार
या गोळ्यांमध्ये वापरण्यात आलेल्या घटकांमध्ये दोष असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बºयाच कंपन्यांनी या औषधांचा पुरवठा करणे थांबविले आहे. या औषधांची पडताळणी करून त्यानंतर त्यात दोष आढळल्यास ते घटक काढून हे नवीन औषध बाजारपेठेत आणले जाईल. या औषधांमुळे हे घटक सदोष आढळल्यास शरीरावर घातक परिणाम होण्याची शक्यता निश्चित आहे, मात्र तत्पूर्वी घटकांची पडताळणी होणे आवश्यक आहे. तूर्तास हे औषध अजून बंद केलेले नाही, याचा पुरवठा कंपन्यांनी थांबविला आहे.
- डॉ. शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद.