नवजात बालकांना दत्तक घेत २ ते ४ लाखांत विक्री, महिला गँग गुन्हे शाखेच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 04:23 AM2019-07-02T04:23:25+5:302019-07-02T04:23:46+5:30
तपासात, आरोपींच्या दोन व्यवहारांची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली. त्यानुसार, त्यांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या. दोन्ही व्यवहारातील महिला अशिक्षित आहेत.
मुंबई : गरीब, अशिक्षित महिलांना हेरायचे. त्यांना मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवून त्या बदल्यात पैसे देऊन त्यांच्याकडील नवजात बालके अवैधरीत्या दत्तक घ्यायचे. त्यानंतर तीच मुले २ ते ४ लाखांत विक्री करणाऱ्या महिला गँगचा गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने पर्दाफाश केला आहे. आरोपींच्या तावडीतून सुटका केलेल्या दोन बालकांना सध्या बालगृहात ठेवण्यात आले आहे.
सुनंदा मसाने (३०), सविता साळुंखे-चव्हाण (३०), भाग्यश्री भागवत कोळी (२६) आणि आशा उर्फ ललिता जोसेफ (३५) अशी अटक टोळीतील महिलांची नावे आहेत. तर अमर देसाई आणि भाग्यश्री कदम (४२) यांनी बालकांना विकत घेतल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ही मंडळी झोपडपट्टी तसेच पालिका रुग्णालयात दाखल होत गरीब, गरजू अशिक्षित महिलांना हेरायची. त्यानंतर त्यांची भेट घेऊन त्यांच्या मुलांच्या भावी आयुष्याबाबत चर्चा करण्यात येत असे.
मुलांना दत्तक दिल्यास त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, हे त्यांना पटवून देत. सोबतच पैशांचेही आमिष दाखवत. त्यामुळे महिला त्यांच्या आहारी गेल्या. या टोळीबाबत समजताच पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने तपास सुरू केला.
तपासात, आरोपींच्या दोन व्यवहारांची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली. त्यानुसार, त्यांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या. दोन्ही व्यवहारातील महिला अशिक्षित आहेत.
त्या या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ होत्या. त्यांना मूल दत्तक दिल्याच्या बदल्यात एक ते दीड लाख रुपये देण्यात आले होते. तीच मुले या टोळीने दोन ते चार लाखांत विकल्याचे तपासात समोर आले.
आरोपी पालिका रुग्णालयाची सुरक्षारक्षक
सविता ही गोवंडी येथील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. ३ वर्षांपूर्वी बाळचोरी प्रकरणात तिला अटक करण्यात आली होती. त्यातून जामिनावर बाहेर येताच, तिने अशा प्रकारे मुलांची विक्री सुरू केली होती. कोळी एका खाजगी दवाखान्यात समन्वयक म्हणून काम करते, तर जोसेफ सरोगसी करणाºया संस्थांबरोबर काम करत असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.
मुलगा हवा म्हणून मुलाची खरेदी
अटक करण्यात आलेल्या अमर देसाईला मुलगा हवा होता म्हणून मुलाची खरेदी केली. त्याला तीन मुली आहेत.
गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन
या गँगच्या जाळ्यात अडकून तुम्हीही तुमच्या मुलांना दत्तक दिले असल्यास गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.