मुंबई : ज्वेलर्सच्या दुकानात सेल्सगर्ल्स म्हणून काम करताना लाखोंचा गंडा घालणाऱ्या महिलेचा पर्दाफाश करण्यास मुलुंड पोलिसांना यश आले. कीर्तीदा कोटेजा असे या महिलेचे नाव असून, वर्षभरात तिने तब्बल ४६ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. मुलुंड पश्चिमेकडील आर.आर. टी रोड येथे अंकित दोषी यांचे भारती ज्वेलर्स हे दुकान आहे. याच दुकानात वर्षभरापासून कीर्तीदा कोटेजा (४९) त्यांच्याकडे सेल्सगर्ल म्हणून काम करत होती. पूर्वी अनेक नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात काम केल्याचा तगडा अनुभव असल्याने दोषी तिच्यावर जास्त विश्वास ठेवत होते. दुकान बंद करताना दागिन्यांची तपासणी करून अहवाल देण्याचा अधिकार त्यांनी तिला दिला. या अधिकाराचा गैरफायदा घेत कोटेजा हातसफाईने रोज त्यातील एक दागिना लंपास करत होती. चोरी पकडली जात नसल्याने, हा तिचा दिनक्रमच बनला होता. अशा प्रकारे तिने दुकानातील तब्बल १ किलो ६०० ग्रॅम दागिन्यांवर हात साफ केला. २७ जानेवारी रोजी दागिन्यांची पडताळणी करत असताना, दुकानातील १ किलो ७५१ ग्रॅम दागिने चोरीस गेल्याची माहिती समोर आली. याबाबत दोषींनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. या दरम्यान कोटेजाच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेत पडल्या. त्यांनी तत्काळ चौकशीसाठी तिला ताब्यात घेतले असता तिने गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातसफाईकडे कुणाचे लक्ष जात नसल्याने तिला दागिने चोरण्याची चटक लागली. यातील काही दागिन्यांवर तिने २८ लाखांचे कर्ज घेतले. यातून मिळालेली रक्कम ती आपल्यासह प्रियकरासोबतच्या हौसमौजसाठी वापरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, चोरीला गेलेल्या उर्वरित दागिन्यांबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)
सेल्सगर्लचा ४६ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
By admin | Published: February 02, 2016 3:49 AM