‘हिमालयन फॉरेस्ट थ्रश’ला सलीम अली यांचे नाव
By admin | Published: January 22, 2016 03:25 AM2016-01-22T03:25:24+5:302016-01-22T03:25:24+5:30
हिमालयाच्या पर्वतराजींमध्ये नव्याने आढळलेल्या ‘हिमालयन फॉरेस्ट थ्रश’ या पक्ष्याला सलीम अली यांचे नाव देण्यात आले आहे. ‘
मुंबई: हिमालयाच्या पर्वतराजींमध्ये नव्याने आढळलेल्या ‘हिमालयन फॉरेस्ट थ्रश’ या पक्ष्याला सलीम अली यांचे नाव देण्यात आले आहे. ‘झुथेरा सलीमअली’ असे नाव देण्यात आलेला ‘हिमालयन फॉरेस्ट थ्रश’ हा पक्षी देशात प्रथमच आढळला आहे. या पक्ष्याच्या प्रजातीच्या शोधासाठी भारतासह, स्वीडन, चीन, अमेरिका आणि रशिया येथील पक्षीतज्ज्ञांचा समावेश आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष्यांच्या नव्या प्रजातींच्या शोध लागणे हल्ली दुर्मीळ झाले आहे. २ हजार सालापासून विचार केला असता, प्रत्येक वर्षाला केवळ पाच नव्या प्रजातींच्या पक्ष्यांचा शोध लागलेला आहे. त्यातील बहुतांश पक्ष्यांचा शोध दक्षिण अमेरिकेत लागलेला दिसून येतो. ‘हिमालयन फॉरेस्ट थ्रश’ या प्रजातीचा पक्षी प्रथमच भारतात आढळून
आला आहे. डॉ. पेर अॅल्सस्ट्रॉम
आणि शशांक दळवी यांचाही या पक्ष्याचा शोध घेणाऱ्या टीममध्ये समावेश होता.
२००९ सालीच या पक्ष्याचे अस्तित्व आढळले होते. अरुणाचल प्रदेशात आढळून येणाऱ्या ‘प्लेनबॅक थ्रश’ या पक्ष्याच्या प्रजातीशी त्याचे साधर्म्य असल्याने, या संशोधनावर शिक्कामोर्तब होत नव्हते, परंतु अथक प्रयत्नांती, तब्बल सहाएक वर्षांनंतर ‘हिमालयन फॉरेस्ट थ्रश’ ही पक्ष्याची प्रजाती प्रथमच आढळल्याचे समोर आले. संशोधनकर्त्यांनीच ‘हिमालयन फॉरेस्ट थ्रश’चे ‘झुथेरा सलीमअली’ असे नामकरण केले आहे. या प्रजातीचे पक्षी मध्य चीनमध्ये आढळत असल्याचे संशोधकांच्या टीमने म्हटले आहे. (प्रतिनिधी)