Join us

सलीम आणि जावेद यांची लवकरच भेट होणार; मोहित कंबोज यांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 6:26 PM

सलीम आतमध्ये गेलेत, जावेदही लवकरच जाणार आहेत. सलीम-जावेदची भेट लवकरच होणार आहे असा टोला भाजपा नेते मोहित कंबोज यांनी लगावला आहे.

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या मालमत्तेवर ईडीनं जप्तीची कारवाई केल्यानंतर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून ही सूडाचं राजकारण केले जात आहे असा आरोप केला आहे. तर भाजपा नेत्यांनी या कारवाईचं स्वागत करत लवकरच संजय राऊत जेलमध्ये जातील असा दावा करत आहेत.

या कारवाईवर भाजपा नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) म्हणाले की, ईडीनं संजय राऊतांवर जी कारवाई केली त्याचे स्वागत आहे. कष्टानं, घामाच्या पैशाने ही संपत्ती जमवली असं राऊत म्हणतात. कुठलंही उत्पन्न नसताना अद्याप ६५० हून अधिक पत्राचाळीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली नाही. मात्र संजय राऊतांना कोट्यवधीचा फ्लॅट मिळाला. हा पैसा कुठून आला? हे पैसे प्रविण राऊतांनी जो भ्रष्टाचार केला तो कुणाच्या जीवावर केला? असा सवाल त्यांनी केला आहे.

तसेच लोकांची घरं हिसकावून आशियाना बनवण्याचं काम प्रविण राऊतांनी संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केले. नालासोपारा, वसई, विरार, गोरेगावसह अन्य प्रकल्पग्रस्तांना अद्याप घरे मिळाली नाहीत. मात्र कोट्यवधीची घरे राऊतांना मिळाली. आम्ही आधीपासून सांगतोय सलीम आतमध्ये गेलेत, जावेदही लवकरच जाणार आहेत. सलीम-जावेदची भेट लवकरच होणार आहे असा इशारा देत भाजपा नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक-संजय राऊतांवर थेट टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

कष्टाने कमवलेली संपत्ती ईडीने जप्त केली. १ रुपयाही अवैध मार्गाने जमा झाला असेल तर सगळी संपत्ती भाजपाला दान करू. ५५ लाखांचे कर्ज होते हे प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. ईडीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. जप्त केलेल्या फ्लॅटमध्ये माझं कुटुंब राहतं. संपत्तीची व्याख्या बदलावी लागेल. तुमच्या बापाला घाबरत नाही असं संजय राऊतांनी भाजपाला सांगितले.

त्याचसोबत माझं राहतं घर टू रुम किचन असेल. मराठी माणसांचं मध्यमवर्गीय कुटुंबाचं घर आहे. अलिबाग गाव आहे तिथे काही जमीन आहे मराठी माणसांकडे इतकी संपत्ती आहे. अशा कारवायांनी शिवसेना, संजय राऊत झुकणार नाही. मला कुठलीही नोटीस आली नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही फोन येऊ गेलेत. जे घडते ते सगळं चांगल्यासाठी घडते. ईडीच्या कारवाईचं आश्चर्य वाटत नाही. सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालयभाजपा