सलीम खान यांना गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार
By Admin | Published: March 20, 2015 12:35 AM2015-03-20T00:35:50+5:302015-03-20T00:35:50+5:30
दुबईत नुकताच पाचवा कलर्स मिक्ता पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतल्या सर्वच कलाकारांनी झाडून परदेशातल्या या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली होती. ँ
मुंबई : दुबईत नुकताच पाचवा कलर्स मिक्ता पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतल्या सर्वच कलाकारांनी झाडून परदेशातल्या या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली होती. ँदुबईतील प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडलेल्या या सोहळ्यात ‘मिस्टर अॅण्ड मिसेस’ हे सर्वोत्कृष्ट नाटक ठरले तर सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘रेगे’ चित्रपटाला मिळाला. प्रेक्षक पसंतीचा चित्रपट म्हणून ‘लय भारी’ चित्रपटाने बाजी मारली. चित्रपट विभागात ‘अस्तु’मधील भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना उत्कृष्ट अभिनेता तर इरावती हर्षेला उत्कृष्ट अभिनेत्रीची पुरस्कार मिळाला. तर नाटक विभागात चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर यांना पुरस्कार मिळाला.
या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, राज ठाकरे, नाना पाटेकर, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, श्रेयस तळपदे यांच्यासमवेत सलीम खान, सलमा खान, हेलन, अरबाज खान, सोहेल खान यांचीही उपस्थिती होती. प्रसिद्ध कथा-पटकथा लेखक सलीम खान यांना राज ठाकरे यांच्या हस्ते गर्व महाराष्ट्राच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कारानंतर सलीम यांची मुलाखत नाना पाटेकरने घेतली. मात्र त्यांना फारशी बोलण्याची संधी न देताच पत्नी सुशीला अर्थात सलमामुळे मराठी भाषेशी आपली नाळ कशी जोडली गेली आहे याच्या अनेक रंजक आठवणी त्यांनी सांगितल्या. माझ्यासाठी हा घरचा पुरस्कार असल्याचेही ते म्हणाले. तर राज ठाकरे यांनी संकटाचा काळ असताना सलीम यांनी कशी उभारी दिली याची आठवण सांगितली. या वर्षीपासून परदेशात मराठी माणसाने गाजवलेल्या कर्तृत्वाबद्दल देण्यात येणारा ‘झेंडा रोविला’ पुरस्कार आर्किटेक्ट अशोक कोरगावकर यांना देण्यात आला.
तीन तास रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यात गश्मीर महाजनी, पूजा सावंत, अंकुश चौधरी, ऊर्मिला कानेटकर, संजय नार्वेकर, भारत गणेशपुरे, भाऊ कदम अशा काही कलाकारांनी विविध नृत्ये, गाणी आणि राजकीय प्रसहन सादर करत गंमत आणली. जितेंद्र जोशी, स्वप्निल जोशी, शशांक केतकर, तेजश्री प्रधान, सुनील बर्वे, सुलेखा तळवलकर यांनी निवेदन केले. कलर्स मिक्ता पुरस्कार रविवारी २२ मार्चला कलर्स मराठी वाहिनीवर दाखवला जाणार आहे. (प्रतिनिधी)
अमृता फडणवीस यांच्या गाण्याची चर्चा
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असूनही अमृता फडणवीस यांनी आपले वेगळे अस्तित्व जपले आहे. कार्यक्र मात जे कलाकार आपल्या गायनानेही प्रसिद्ध आहेत अशा वैभव मांगले, प्रसाद ओक, केतकी माटेगावकर, सुनील बर्वे, महेश-मेधा मांजरेकर यांनी एकसोएक गाणी पेश केली. मात्र यात खरी मजा आणली ती अमृता फडणवीस यांनी. त्यांनी ं‘चांदण्यात फिरताना’, दमादम मस्त कलंदर आणि हेलनचे ‘पिया तू अब तो आजा’ ही गाणी पेश करत उपस्थितांची भरपूर दाद मिळवली. या वेळी त्यांना राहुल रानडे यांनी साथ दिली. मात्र त्यांच्या गाण्यांची निवड पाहून प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू होती.