सलमान खान प्रकरणाचा तपास एसीपीकडे , बिश्नोई गँगचा महाराष्ट्रातील नेटवर्कचा तपास सुरू
By मनीषा म्हात्रे | Published: April 29, 2024 11:49 PM2024-04-29T23:49:40+5:302024-04-29T23:51:37+5:30
बिश्नोई गँगचे महाराष्ट्रातील नेटवर्कचाही गुन्हे शाखा तपास करत आहे.
मुंबई : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींवर मोक्का लावल्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ कडून एसीपी दत्तात्रय नाळे यांच्याकडे ट्रान्सफर करण्यात आला आहे. तसेच, बिश्नोई गँगचे महाराष्ट्रातील नेटवर्कचाही गुन्हे शाखा तपास करत आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या कुख्यात बिश्नोई टोळीच्या आरोपी विकी गुप्ता (२४), सागर पाल (२१) आणि अनुज थापन (३२) यांना विशेष मोक्का न्यायालयाने ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर, आरोपी सोनूकुमार बिश्नोई (३७) याची वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी हे आदेश दिले आहेत.
गुन्ह्याचा तपास हा महत्वाच्या टप्प्यावर असून सखोल तपास करणे गरजेचे आहे. तसेच, गुन्ह्यातील मुख्यसुत्रधारांबाबत तपास आणि पुरावे गोळा करण्यासाठी अटक आरोपींपैकी गुप्ता, पाल आणि थापन यांच्या वाढीव कोठडीची मागणी केली. आरोपी सोनूकुमार हा एका दुर्धर आजाराने ग्रस्त आणि जखमी असल्याने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची मागणी केली. या प्रकरणात मोक्का लावल्यामुळे हे प्रकरण दया नायक यांच्याकडून एसीपी दत्तात्रय नाळे यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार, सर्व कागदपत्रे तसेच आरोपींचा ताबा त्यांच्या कोठडीत देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील नेटवर्कचा तपास...
कुख्यात संघटीत गुन्हेगारी टोळ्या चालविणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई हे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आहेत. त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालेल्या दोन महत्वाच्या गुन्ह्यांची माहिती गुन्हे शाखेने घेतली आहे. तसेच, लॉरेन्स बिश्नोई हा २०१० पासून गुन्हेगारी कारवाया करत असून त्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा, चंदिगढ, दिल्ली आणि राजस्थानमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमक्या अशा सुमारे ९० गुन्ह्यांची नोंद असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या महाराष्ट्रातील नेटवर्कचा गुन्हे शाखा लेखाजोखा काढत आहे.