Join us  

गुगलवरून शोधला सलमानचा ई-मेल आयडी; धमकी प्रकरणातील आरोपीला ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 6:01 AM

मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने धाकद्रम सियागला जोधपूर येथून अटक केली.

मुंबई : सुपरस्टार सलमान खान याच्या कार्यालयात धमकीचा ई-मेल पाठवून खळबळ उडवून देणाऱ्या धाकद्रम सियागला (२१) ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सलमानचा ई-मेल आयडी कसा मिळवला, धमकी का दिली इत्यादींची उत्तरे धाकद्रमच्या तपासातून मिळत आहेत. 

मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने धाकद्रम सियागला जोधपूर येथून अटक केली. त्याला सोमवारी मुंबईत आणण्यात आले. न्यायालयाने धाकद्रमला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. व्यवसायाने वेटर असलेल्या धाकद्रमने गुगलवरून सलमानचा ई-मेल आयडी मिळवला. त्यानंतर त्याला धमकीचा मेल पाठवला. त्याला काही महिन्यांपूर्वी देसी कट्टा ठेवल्याबद्दल आणि सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना धमकीचा मेल पाठवल्याबद्दल राजस्थानमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. 

पोलिसांनी घेतला जागरणात भाग

पोलिसांनी सांगितले की, सियाग हा जोधपूर येथे त्याच्या गावात जागरण सुरू असताना हजर होता. मात्र सर्व ग्रामस्थ जागे असल्याने शनिवारी आरोपीला पकडणे कठीण झाले होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री जोधपूरच्या गावात भगवान अंबे मातेच्या जागरणात सहभागी होऊन आरोपी आणि त्याच्या घराची ओळख पटवली. पोलिसांनी जोधपूर येथील लुनी पोलिसांचीही मदत घेत रविवारी पहाटे सियागला त्याच्या घरातून अटक केली.

टॅग्स :सलमान खानपोलिस