‘सलमान, बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’; धमकीचे पत्र; वडील सलीम खान यांचेही नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 06:45 IST2022-06-06T06:43:03+5:302022-06-06T06:45:03+5:30
Salman Khan : ‘सलीम खान, सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’, असे लिहून त्या धमकीखाली इंग्रजीमध्ये के.जी.बी.एल.बी असे लिहिले होते.

‘सलमान, बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’; धमकीचे पत्र; वडील सलीम खान यांचेही नाव
मुंबई : ‘सलीम खान, सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’, अशा आशयाचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी बॉलिवूड स्टार सलमान खान याचे वडील सलीम खान यांना रविवारी मिळाली. त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लेखक सलीम खान हे रविवारी सकाळी आपल्या सुरक्षारक्षकासह वॉकसाठी वांद्रेच्या बॅन्डस्टॅन्ड प्रॉमीनेड येथे गेले होते. व्यायाम झाल्यानंतर ते नेहमीच्या ठिकाणी बेंचवर बसले. त्या बेंचवर त्यांचा सुरक्षारक्षक श्रीकांत हेगिष्टे यांना एक चिठ्ठी आढळली. यात ‘सलीम खान, सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’, असे लिहून त्या धमकीखाली इंग्रजीमध्ये के.जी.बी.एल.बी असे लिहिले होते.
केली होती ‘रेकी’?
धमकी देणाऱ्या व्यक्तीने सलीम यांच्यावर पाळत ठेवून ते सकाळी कुठे जातात, कुठे बसतात याची माहिती मिळविण्यासाठी त्यांची रेकी केली आणि मग चिठ्ठी ठेवली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळीचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेत त्याची पडताळणी सुरू केली आहे. तसेच पाेलिसांनी सलीम खान यांच्या घराजवळ सुरक्षा वाढविली आहे.