Join us

"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 12:38 AM

या आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण आले आहे. आपल्या भावाची पोलिसांनी हत्या केल्याचा खळबळजनक आरोप अनुजच्या भावाने केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने बुधवारी लॉकअपमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. अनुज थापन असे या आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. 14 एप्रिल रोजी सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला होता. या घटनेतील दोन हल्लेखोरांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप अनुजवर होता. मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण आले आहे. आपल्या भावाची पोलिसांनी हत्या केल्याचा खळबळजनक आरोप अनुजच्या भावाने केला आहे.

पंजाबमधील अबोहरच्या सुखचैन गावातील रहिवासी असलेला अभिषेक थापनने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, मुंबई पोलीस गेल्या 6-7 दिवसांपूर्वी अनुजला संगरूर येथून घेऊन गेले होते. आज आम्हाला, अनुजने आत्महत्या केल्याचा फोन आला. तो आत्महत्या करेल असा नव्हता. पोलिसांनी त्याची हत्या केली. आम्हाला न्याय मिळावा. तो एक ट्रक हेल्पर म्हणून काम करत होता.''

अनुज थापन उर्फ ​​अनुज कुमार ओमप्रकाश थापन याला 26 एप्रिल रोजी पंजाबमधील संगरूर येथून अटक करण्यात आली होती आणि मुंबई पोलीस मुख्यालयात गुन्हे शाखेच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. तो आज लॉक-अपच्या शौचालयात बेडशीटचा वापर करून लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात येणार असून राज्य सीआयडी मृत्यूची चौकशी करणार आहे.

टॅग्स :सलमान खानमुंबई पोलीसपोलिस