Join us  

सलमान खानला धमकी; लॉरेन्स बिश्नोईवर संशय, सलमानला पत्र धाडले कुणी?; शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 7:10 AM

Salman Khan : दिल्ली पोलीस अभिनेता सलमानला दिलेल्या धमकी पत्राबद्दल तिहार कारागृहात बंद असलेल्या बिश्नोईकडे चौकशी करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना मिळालेल्या धमकीपत्राचा संबंध गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी असल्याचे आढळल्यास मुंबई पोलीस दिल्लीला जातील, अशी माहिती सोमवारी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली. दरम्यान, पत्राची सत्यता पडताळली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अभिनेता सलमान आणि त्याच्या वडिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत. मात्र त्याबाबत सार्वजनिक भाष्य करू शकत नाही, असेही पांडे म्हणाले. धमकी पत्रातील ‘जीबी’ व ‘एलबी’ च्या उल्लेखांबाबत पांडे म्हणाले की, पत्राबाबत काही बोलणे अतिघाईचे ठरेल. सध्या आम्ही त्याची सत्यता पडताळत आहोत.

दिल्ली पोलीस अभिनेता सलमानला दिलेल्या धमकी पत्राबद्दल तिहार कारागृहात बंद असलेल्या बिश्नोईकडे चौकशी करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पत्राचा बिश्नोईशी संबंध आढळला, तर गरज पडल्यास मुंबई पोलीस दिल्लीलाही जातील, असेही आयुक्तांनी नमूद केले. सोमवारी परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनीही खान कुटुंबियांची भेट घेतली. पोलिसांनी २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमे-यातील फुटेजची पाहणी केल्याचे सांगण्यात येते. 

‘सीबीआय’ची भेटसलमान खानच्या वांद्रे येथील बंगल्यावर सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने भेट दिल्याची माहिती आहे. या भेटीमागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसून, हा तपासाचाच भाग असल्याचे बोलले जात आहे.

आद्याक्षरांमुळे पोलीस बुचकळ्यातसलमान खानला मिळालेले पत्र हे हिंदी भाषेत असून, त्याच्या शेवटी लिहिलेल्या जी.बी. आणि एल.बी. या आद्याक्षरांचा अर्थ गुंड गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई असा काढला जात आहे. लॉरेन्स बिश्नोईने २०११ च्या ‘रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानवर हल्ल्याची योजना आखली होती, परंतु तो अयशस्वी झाला. त्यानंतर सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याच्याही हिटलिस्टवर सलमान असल्याचा खुलासा झाला आहे. गँगस्टर नरेश शेट्टीला अभिनेत्यावर हल्ला करण्याचे काम दिले. ब्रारच्या टोळीतील संपत नेहराने २०१८ मध्ये वांद्रे येथील सलमानच्या घराची रेकीही केली होती; तर दिल्ली पोलिसांनी सलमानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी बिश्नोई टोळीच्या तीन शार्प शूटरना वाशी येथून अटक केली होती.

टॅग्स :सलमान खानमुंबई