सलमान खान विरोधात घात लावून बसलेल्या बिश्नोई टोळीमुळे मुंबई पोलीस कामाला लागली आहे. आज पहाटे सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. यामुळे बॉलिवूडसोबतच राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. दुसरीकडे सलमानवर एवढा गोळीबार करण्याची हिंमत कोणी केली, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. दोन्ही हल्लेखोरांचे फोटो बाहेर आले असून सलमानच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये त्यांचे चेहरे कैद झाले आहेत. यापैकी एकाची ओळख पटली आहे.
सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्याची ओळख विशाल उर्फ कालू असे असून त्याने काही महिन्यांपूर्वी गुरूग्राममधील एका स्क्रॅप डीलरवर गोळीबार केला होता. तेव्हापासून विशाल हा फरार होता. तो गँगस्टर रोहित गोदरासाठी काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सलमान खानचे घर गॅलेक्सी इमारतीच्या पहिल्या दोन मजल्यांवर आहे. या घरावर या हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. यामुळे पोलिसांनी तपास वेगाने करत या दोन्ही हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज शोधून काढले आणि त्यापैकी एकाची ओळख पटली आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलमानची भेट घेतली आहे. त्याच्या घरी जात राज यांनी भेट घेत विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे सलमानला भेटण्यासाठी गेले होते. सलमान गोविंदाप्रमाणे शिंदेंसाठी प्रचार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. याच्या पार्श्वभूमीवर सलमानवर हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. सलमानवर पनवेलच्या फार्म हाऊसवरही लॉरेन्स बिश्नोईचे शार्प शूटर नजर ठेवून होते. यानंतरचा हा दुसरा प्रयत्न आहे.