मुंबई : अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्राचा संबंध गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी जोडला जात होता. मात्र त्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका पोलिसांसमोर घेतल्याने धमकीचे पत्र पाठविणाऱ्याबाबतचे गूढ वाढत चालले आहे. दरम्यान, पोलिसांनी गार्डनच्या सफाई कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असून तो सध्या संशयाच्या घेऱ्यात असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दिल्ली पोलिसांनी सलीम यांना मिळालेल्या पत्राबाबत बिश्नोईकडे चौकशी केली. तेव्हा यामध्ये त्याचा सहभाग नसून ते कोणी पाठवले याबाबतही काहीच माहीत नसल्याने उत्तर दिले. त्यामुळे हे पत्र अन्य कोणत्या टोळीकडून पाठविण्यात आले आहे की हा निव्वळ खोडसाळपणा आहे, या अनुषंगाने मुंबई पोलीस तसेच गुन्हे शाखा तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास २०० ते २५० सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी अद्याप करण्यात आली आहे. मात्र सलीम यांना चिठ्ठी मिळाली त्या परिसरात कोणीही आल्याचे किंवा गेल्याचे दिसत नाही. याप्रकरणी अद्याप ४० हून अधिक लोकांची चौकशीही पोलिसांनी केली. मात्र त्यांच्याकडूनही काहीच माहिती मिळालेली नाही.
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सलीम वांद्रे येथील बॅन्डस्टॅन्ड प्रॉमिनेड गार्डनमध्ये असलेल्या नेहमीच्या बेंचवर जाऊन बसले. ते त्या ठिकाणाहून निघत असताना तिथे सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने बेंचखाली पडलेला कागदाचा कपटा उचलून त्यांचे सुरक्षारक्षक श्रीकांत हेगिष्टे यांच्या हातात दिला. यावरून घटनास्थळी त्या तिघांव्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हते, असे स्पष्ट होते.
धमकीचा फोन आला नाहीमुंबई पोलिसांनी सोमवारी सलमानचादेखील जबाब नोंदविला. त्यावेळी मला कोणताही धमकीचा फोन आला नसल्याचे त्याने पोलिसाना सांगितले. चौकशीनंतर तो चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला निघून गेला.