सलून चालकांचे आंदोलन, आर्थिक पँकेजची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 07:07 PM2020-06-10T19:07:16+5:302020-06-10T19:08:01+5:30
कोरोनाचा प्रसार झाल्यापासून लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावला गेल्याने व सरकारने नवीन धोरणामध्ये दिलासा न दिल्याने नाराज झालेल्या सलून व ब्यूटी पार्लर संघटनेने आज त्यांच्या दुकानांसमोर आंदोलन करत सरकारचा निषेध केला.
मुंबई : कोरोनाचा प्रसार झाल्यापासून लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावला गेल्याने व सरकारने नवीन धोरणामध्ये दिलासा न दिल्याने नाराज झालेल्या सलून व ब्यूटी पार्लर संघटनेने आज त्यांच्या दुकानांसमोर आंदोलन करत सरकारचा निषेध केला. सरकारने सलून व्यावसायिकांना आर्थिक पँकेज देण्याची मागणी संघटनेने सरकारकडे केली आहे. सरकारच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन दुकानासमोर निषेधाचे बोर्ड लावून व हातावर काळी फित बांधून सलून व्यावसायिकांनी राज्यभरात आंदोलन केले.
तीन महिन्यांपासून पार्लर बंद असल्याने सरकारने आमचे या तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे ,अनेक ठिकाणी जागा भाड्याने घेतलेली आहे व जागा मालकाकडून भाड्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी व भाडे माफ करावे तर आम्हाला आधार मिळेल असे मत सलून ब्युटीपार्लर असोसिएशन महाराष्ट्रचे सचिव प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केले. सरकारने सलून व्यावसायिकांसाठी आर्थिक पैकेज जाहीर करावे ,असंघटीत कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा सलून कामगारांना लाभ मिळावा अशी तरतूद करावी, अशा विविध मागण्या संघटनेने केल्या आहेत. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने या आंदोलनात भाग घेतल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. सरकारने अजून आंदोलनाची दखल घेतलेली नाही त्यामुळे चव्हाण यांनी खंत व्यक्त केली.
कोरोनामुळे लॉकडाऊन हळूहळू उठवला जात असताना मुंबईच्या उपनगरातील सलून आणि ब्युटी पार्लर चालकांना अद्याप सरकार कडून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे.आम्ही विविध मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा केला पण प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याच्या निषेधार्थ बुधवारी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून १० ते ११ या वेळेत सलून बाहेर आंदोलन करण्यात आले व सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.