Join us

ग्राहकांच्या जखमेवर मीठ : पेट्रोल-डिझेलचे दर १ पैशाने घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 6:26 AM

कर्नाटक निवडणुकीनंतर सलग १६ दिवस इंधन दरवाढ करणाऱ्या तेल कंपन्यांनी अखेर १७व्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात लीटरमागे प्रत्येकी एक पैशाने कपात केली

चेतन ननावरेमुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर सलग १६ दिवस इंधन दरवाढ करणाऱ्या तेल कंपन्यांनी अखेर १७व्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात लीटरमागे प्रत्येकी एक पैशाने कपात केली आहे. देशभर सरकारविरोधात मोर्चे आणि आंदोलने होत असताना इंधन दरात केवळ एका पैशाने केलेल्या कपातीमुळे वाहन चालकांच्या जखमेवर मीठ चोळल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.याआधी मुंबईत वाहनचालकांना मंगळवारी पेट्रोलसाठी लीटरमागे ८६.२४ रुपये, तर डिझेलसाठी ७३.७९ रुपये मोजावे लागत होते. त्यात एका पैशाने घट झाल्याने बुधवारी ग्राहकांना पेट्रोलसाठी ८६.२३ रुपये, तर डिझेलसाठी ७३.७८ रुपये मोजावे लागणार आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन दर २४ एप्रिलपासून ते १३ मे पर्यंत स्थिर होते. त्यानंतर १४ मेपासून पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत होती. मात्र ३० मे रोजी प्रथमच पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत एका पैशाने घट होणारआहे.मे २०१४ साली देशात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने २०१५ आणि २०१६ सालापर्यंत पेट्रोल व डिझेलच्या दरांत सातत्याने कपात केली होती. मात्र, नोटबंदीनंतर सरकारने थेट सर्वसामान्यांच्या खिशात हात घेतल्याचे दिसते.१६ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील पेट्रोल पंपांवर जाहीर झालेले पेट्रोलचे प्रति लीटरसाठी ७२ रुपये २९ पैसे इतके होते. नोटाबंदीपासून आत्तापर्यंतच्या दरवाढीतील पेट्रोलचा हा सर्वात कमी भाव आहे. कारण त्यानंतर, पुन्हा कधी पेट्रोलने प्रति लीटरसाठी ७२ रुपयांचा आकडा पाहिलाच नाही. मुंबईकरांना आजतागायत इतक्या कमी दराने पेट्रोल भरता आले नाही.आजघडीला पेट्रोलचे प्रति लीटरसाठीचे दर ८७ रुपयांकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे सरकारकडून इंधन दरवाढ ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाºया चढ्या दरांचा परिणाम असल्याचे सांगण्यात येत असले, तरी नोटाबंदीनंतर इंधन दरात झालेली वाढ नोटाबंदीचा इंधनदराशी थेट संबंध असल्याचे स्पष्ट करते.