मुंबई : शहरातील एक प्रमुख ओळख बनलेले कबुतरखाने स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यासाठी मात्र धोकादायक ठरत आहेत. खार मार्केट येथील कबुतरखाना हटविण्याची मागणी स्थानिकांकडून होत होती. हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. मंगळवारी हा कबुतरखाना महापालिकेने बंद केला आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत ३८ ठिकाणी कबुतरखाने आहेत. या कबुतरखान्यांत टाकण्यात येणारे दाणे खाण्यासाठी कबुतरे येत असतात. त्यांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे म्हणजेच दमा व क्षयरोगासारखे आजार संभावतात. खार जंक्शन पहिले व सातवी गल्ली येथील कबुतरखाना हटविण्याची मागणी स्थानिकांकडून होत होती. त्यानुसार, महापालिकेने २०१८ मध्ये संबंधित ट्रस्टला नोटीस बजावली.
कबुतरांना दाणे घालणे बेकायदेशीरपणे होते सुरू
या कबुतरखान्याची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली होती. वाहतूक बेटाचे आरक्षण असलेल्या या जागेवर कबुतरांना दाणे घालण्याचे काम बेकायदेशीरपणे सुरू होते. या वाहतूक बेटाचे सौंदर्यीकरण करणे अपेक्षित असताना कबुतरांना दाणे टाकण्याचे काम सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक करीत होते. त्यानुसार, पालिकेने हा कबुतरखाना मंगळवारी बंद केला.