Join us

समुद्राचे क्षारयुक्त पाणी शेतजमीनीत घुसले

By admin | Published: February 24, 2015 10:45 PM

डहाणू तालुक्यात सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याअभावी किनाऱ्यालगत शेतजमीनीत भरतीच्या क्षारयुक्त पाण्याच्या शिरकावाने भातशेती नापीक बनली आहे.

बोर्डी : डहाणू तालुक्यात सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याअभावी किनाऱ्यालगत शेतजमीनीत भरतीच्या क्षारयुक्त पाण्याच्या शिरकावाने भातशेती नापीक बनली आहे.डहाणू तालुक्यातील समुद्रकिनारी अवैध रेती उपसा, सुरू बागेला आग लावणे, झाडांची कत्तल, चारचाकी गाड्या बागेत उभ्या करणे, समुद्र अधिनियमाचे खुलेपणाने उल्लंघन, आदिवासींच्या शेतजमीनी खरेदी करणे, भराव घालून अवैध बांधकाम इ. गैरप्रकारांचे पेव फुटले आहे. डहाणूतील महसूल विभाग, वन विभाग, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि किनाऱ्याची धूप सुरू आहे. भरतीच्या लाटांचे पाणी लगतच्या शेत जमीनीत शिरून भातशेती नापीक बनली आहे. बुधवारी १८ फेब्रुवारीला अमावस्या तसेच नंतरचे दोन, तीन दिवस भरतीचे क्षारयुक्त पाणी नरपड, चिखले, घोलवड गावातील भातखाचरांत शिरल्याने शेतकरी पुरता हवालदील झाला असून शेतीपासून परावृत्त होण्याच्या मार्गावर आहे.संबंधित गावच्या ग्रामपंचायतीनी शासनाचा निधी वापरून केलेले बांधकाम क्षारयुक्त पाणी थांबवण्यास अयशस्वी ठरले आहे. (वार्ताहर)