मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असून वर्तमानपत्र, चॅनेल, आकाशवाणी सर्वत्र कोरोनाच्याच बातम्या वाचायला, पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. लॉकडाऊमुळे लोकांना घरातच थांबावे लागत आहे. या संकटामुळे हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मजूर पायी आपापल्या गावी जाण्यासाठी आटापीटा करत आहेत. त्यांच्या डोळ्यांतील व्यथा, हतबल झालेले चेहरे आणि लहान मुलांचे होत असलेले हाल, पाहून मन सुन्न झाले आहे. पण, काही गोष्टी नक्कीच आपल्याला नवीन काहीतरी शिकवत आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन असाच ऊर्जा देणारं एक व्हिडिओ शेअर केला आहे.
'महिंद्रा अॅण्ड महिंद्रा' उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हटके व्हिडिओ किंवा विचार शेअर करत असतात. काहीतरी वेगळं अन् ऊर्जा देणारं त्यांचं ट्विट नेहमीच नेटीझन्सना भावतं. यापूर्वीही त्यांनी, एक व्हिडीओ पोस्ट केला. तो तुमच्या आमच्या सर्वांना सुखावणारा ठरला. कोरोना संकटात आपल्याला हवी हवीशी जादू की झप्पी, तो व्हिडीओ पाहून का होईना आपण फिल करू शकलो. त्यानंतर, आता महिंद्रा यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. पण, कोरोना संकटाच्या काळातही परिस्थितीचं आव्हान पेलण्यास आपणाला हा व्हिडिओ नक्कीच ऊर्जा देईल, असे महिंद्रा यांनी म्हटलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एक मुलगी आपल्या दोन पायांनी गाडी चालवताना दिसत आहे. दोन्ही हात नसल्यामुळे पायानेच ती आपल्या हाताचं काम करताना दिसून येत आहे. सुरुवातील पायानेच गाडीचा दरवाजा उघडणे, गाडीची चावीही पायानेच लावणे आणि त्यानंतर गाडी ड्राईव्ह करणे हेही पायानेच ही मुलगी करत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, नक्कीच आयुष्यातील प्रत्येक संकटावर आपण मात करु शकतो, हेच आपल्याला शिकता येईल.