Join us

सॅल्युट देवसाब! शंभराव्या जन्मदिनीही सिनेमे ‘हाऊसफुल्ल’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 7:15 AM

मुंबईत ९५ टक्के, तर देशभरात ६० टक्के बुकिंग

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सिनेरसिकांचे लाडके सदाबहार अभिनेते देव आनंद यांची शंभरावी जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त देव आनंद यांचे गाजलेले चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. मुंबईसह देशभरात हे सिनेमे पाहण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. देव आनंदच्या लोकप्रियतेचा जलवा आजही कायम असल्याचे या निमित्ताने दिसून आले.  

एनएफडीसी आणि फिल्म हेरिटेज फाउंडेशन यांच्या सहयोगाने पीव्हीआर आणि आयनॅाक्स या मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये देव आनंद यांचे सिनेमे प्रदर्शित करण्यात आले. २३ आणि २४ सप्टेंबर रोजी देशातील ३० शहरांमधील पीव्हीआर आणि आयनॅाक्समधील ५६ स्क्रीन्सवर रसिकांनी ‘जॅानी मेरा नाम’, ‘ज्वेल थीफ’, ‘सीआयडी’, ‘गाइड’ या सिनेमांचा आनंद लुटला. या चार मुख्य चित्रपटांसह पुण्यात २३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत देव आनंद यांचे ‘बाजी’, ‘असली नकली’, ‘तेरे घर के सामने’ हे आणखी तीन चित्रपटही दाखवण्यात आले आहेत.  त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अभिनेते देव आनंद यांच्या चित्रपटांचा आनंद लुटण्यासाठी सिनेरसिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.   

कुठे कुठे झाले चित्रपट प्रदर्शित? मुंबईत ९, पुण्यात ३, सुरतमध्ये २, हैदराबादमध्ये ४, चेन्नईमध्ये ४, बंगळुरूमध्ये ५, तर दिल्ली, लखनौ, गुरगाव, कोलकाता, इंदोर, जयपूर या ठिकाणी प्रत्येक दोन सिनेमागृहांमध्ये देव आनंद यांचे सिनेमे प्रदर्शित झाले. याखेरीज गोवा, अहमदाबाद, गांधीनगर, वडोदरा, जामनगर, छत्रपती संभाजीनगर, कोची, त्रिवेंद्रम, कोइम्बतूर, मोहाली, गुवाहाटी, रायपूर, नागपूर, ओरिसा, ग्वालियार, चंदीगड येथे प्रत्येक एका सिनेमागृहांमध्ये हे चित्रपट प्रदर्शित झाले. 

देव आनंद यांच्या सिनेमांना मुंबईमध्ये ९० ते ९५ टक्के, देशातील विविध शहरांमध्ये सरासरी ५५ ते ६० टक्के बुकिंग मिळाले. आजही देव आनंद यांच्या चाहत्यांचा मोठा वर्ग आहे. त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आजच्या तरुणाईलाही मनोरंजन विश्वात माइलस्टोन ठरलेले सिनेमे पाहण्याची संधी मिळाली. - प्रकाश चाफळकर, सचिव, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया  

 

टॅग्स :बॉलिवूडमुंबईदेव आनंद