Join us  

लिंगाणा सर करणाऱ्या गुजर यांना मानवंदना

By admin | Published: May 11, 2017 2:24 AM

कोणत्याही मदतीविना लिंगाणा किल्ला सर करणारे पहिले गिर्यारोहक संतोष गुजर यांना सह्याद्री प्रतिष्ठानने अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोणत्याही मदतीविना लिंगाणा किल्ला सर करणारे पहिले गिर्यारोहक संतोष गुजर यांना सह्याद्री प्रतिष्ठानने अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. सह्याद्रीच्या कार्यकर्त्यांनी ६४ दुर्गप्रेमींसोबत लिंगाणा सर करून गुजर यांना मानवंदना देत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसंवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, स्वराज्यात महत्त्वाचा आणि अवघड चढाई असलेला किल्ला म्हणून लिंगाणा किल्ल्याची ओळख आहे. ब्रिटिशांनी या किल्ल्याची पायवाट उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे या किल्ल्यावर कोणत्याही मदतीशिवाय चढाई करणे अशक्य वाटते. सत्तरच्या दशकात गिर्यारोहण व प्रस्तारोहण जास्त प्रचलित नव्हते. लिंगाणा सर करणे म्हणजे कठीण आव्हानाला तोंड देणे होते. या किल्ल्याचा माथा दोरीच्या साहाय्याशिवाय गाठणे अशक्यच होते. मात्र, २५ डिसेंबर १९७८ रोजी गुजर सरांनी हिरा पंडित यांच्यासह १२ गिर्यारोहकांसोबत रोपच्या मदतीने लिंगाणावर यशस्वी चढाई केली. या चढाईनंतर गुजर यांनी कोणत्याही साहित्याशिवाय चढण्याचा विक्रम प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला. ठीक वर्षभरानंतर ३० डिसेंबर १९७९ रोजी गुजर यांनी लिंगाण्याचा सर्वोच्च माथा गाठून तिथे भगवा ध्वज फडकवला होता. मात्र, किल्ला उतरताना त्यांचा तोल दरीत जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता. जानेवारी २०१२मध्ये गुजर यांचे सहकारी दिलीप झुंजारराव यांनी कोणत्याही साहित्याशिवाय किल्ला सर करत गुजर यांना मानवंदना दिली होती. त्यानंतर आजही तो विक्रम अबाधित आहे.