मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत पोलिसांनी जीवाची पर्वा न करता चाेख कर्तव्य बजावले. यात, गेल्या वर्षभरात कोरोनामुळे ९९ पोलिसांना जीव गमवावा लागला.
कोरोना काळात लॉकडाऊन, जमावबंदी आदेशाच्या अंमलबजावणीसह महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, चाचणीसाठी आलेल्या किंवा संसर्ग झालेल्या रुग्णांची, नातेवाइकांची नोंदणी, रुग्णाचा मृत्यू झाल्यास पंचनाम्यापासून अंत्यविधीपर्यंतची जबाबदारी, विलगीकरण केंद्रांबाहेरील बंदोबस्त, होम क्वारंटाईनचे शिक्के असलेल्या व्यक्ती स्थानबद्ध आहेत ना याची खातरजमा, लागण झालेल्या वस्त्या किंवा इमारती पालिकेने ताब्यात घेतल्यानंतर तेथील बंदोबस्त आदी सर्वच जबाबदाऱ्या पोलिसांवर आल्या. यात पोलीस ठाण्यात कार्यरत मनुष्यबळावर सर्वाधिक ताण होता. या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडलेली व्यक्ती सुखरूप आणि संसर्गाची लागण न होता परतेल का, हे दडपण पोलिसांच्या कुटुंबावर होते आणि आजही कायम आहे.
कोरोना संसर्ग पोलीस दलात झपाट्याने पसरू लागल्याने पोलीस ठाण्यांतील ५५ वर्षांपुढील आणि मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग आदी विकार असलेले ५० वर्षांपुढील अधिकारी, अंमलदारांना कामावर न बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी पोलीस ठाण्यात उपलब्ध मनुष्यबळाला आणखी कात्री लागली आणि उरलेल्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडू लागला. गृह अलगीकरणात असलेल्या किंवा प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या अधिकारी, अंमलदारांनाच कामावर बोलावण्यात आले. इतकेच नव्हे तर निवृत्तीला काही दिवस उरलेल्या म्हणचे ५८ वर्षांपर्यंतच्या अधिकारी, अंमलदारांवरही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येऊ लागल्या.
या परिस्थितीत पोलीस ठाण्यांत कार्यरत मनुष्यबळाला पुरेसा आराम मिळावा म्हणून १२ तास काम केल्यानंतर २४ तास आराम देण्याचा (१२/२४) निर्णय घेण्यात आला. मात्र मनुष्यबळ कमी पडते हे निमित्त करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नियमाला हरताळ फासत १२ तासांनी पुन्हा कामावर बोलावण्यास सुरुवात केली. काही पोलीस ठाण्यांत हा नियम फक्त ठरावीक कर्मचाऱ्यांपुरता अबाधित ठेवण्यात आला होता. याचा सर्वाधिक फटका मुंबईबाहेर राहणाऱ्या अधिकारी, अंमलदार आणि गर्भवती किंवा प्रसूती रजेवरून परतलेल्या महिला पोलिसांना बसला होता.
याच काळात सेवा बजाविताना वर्षभरात कोरोना विरुद्धच्या या लढ्यात ९९ पोलिसांना जीव गमवावा लागला. त्यातच आता पुन्हा कोरोना डोके वर काढू लागल्याने पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव पुन्हा हळूहळू होताना दिसत आहे. दरम्यान, पोलीस दलात आतापर्यंत जवळपास ५० टक्के पोलिसांनी कोरोनाची लस घेतली.