Join us

मुंबईला सलाम

By admin | Published: July 24, 2016 2:49 AM

इस १९९४ चा सप्टेंबर महिना. मुंबईमध्ये जातोयस? सांभाळून मंग्या, तिथली माणसे खूप व्यवसायिक असतात. कामाशिवाय बोलत नाहीत. ‘लोकल’ स्टेशनवर थांबत नसते. चालू ट्रेनमध्येच चढावं

- मंगेश देसाईइस १९९४ चा सप्टेंबर महिना. मुंबईमध्ये जातोयस? सांभाळून मंग्या, तिथली माणसे खूप व्यवसायिक असतात. कामाशिवाय बोलत नाहीत. ‘लोकल’ स्टेशनवर थांबत नसते. चालू ट्रेनमध्येच चढावं लागते. मुंबईमध्ये रात्री फार फिरायच नसते. कोण कधी गोळ्या घालेल सांगता येत नाही. खिशात पैसे ठेवायचेच नाहीत, कधीही पाकीट मारले जाऊ शकते, अशा अनेक कथा मला सांगितल्या गेल्या होत्या. मी आधीच गावठी, त्यात पुन्हा मला घाबरवून टाकलं होतं, पण मुंबईला यायचेच ठरवले होते मनाशी. त्यामुळे फार विचार न करता, वडिलांनी दिलेल्या २००० रु.चा खजिना घेऊन मुंबईमध्ये आमदार निवास रू.नं. ४१२ ला उतरलो.फार घाबरलो होतो. सगळेच अनोळखी एवढी माणसे, गाड्या कधी बघितल्याच नव्हत्या. मी वडापावच्या गाड्या, चहाचे ठेले, माणसांच्या गर्दी एवढे कधी बघितलेच नव्हते. लोकलचा प्रवास करताना ईस्ट/वेस्ट समजून घेण्यात बरेच दिवस गेले. शेवटी डावा हात वेस्ट आणि जेवणाचा हात ईस्ट असा निष्कर्ष काढला आणि प्रवासाला सुरुवात केली. आणि ईस्ट-वेस्टचा प्रवास करता आला.मला खरी मुंबई कशी आहे हे समजायला लागलं. एकमेकांना मदत करणारे शहर मला जाणवायला लागले. लोकल २ मिनिटे फक्त स्टेशनवर का थांबते, याच कारण समजायला लागलं. रात्री-बेरात्री कधी चुकलो तर नुसते पोलीसच नाही, तर फूटपाथवरीलही आपल्याला मार्ग दाखवतात ही माणुसकीची दुसरी बाजूही मला समजायला लागली आणि बाकी आपुलकीबद्दल म्हणाल, तर एवढ्या आपुलकीची माणसे मला माझ्या गावठाणातपण नव्हती सापडले. पहिल्याच नाटकाच्या निमित्ताने माझी भेट सतीश पुळेकरांबरोबर झाली आणि मुंबईचा समुद्र जेवढा मोठा आहे व तो का मोठा आहे, याचा अनुभव मला आला. आजही कधी-कधी निमावहिनींनी त्या रात्री माझ्यासाठी गरम केलेल्या भाताची आणि काळ्या वाटाण्याच्या उसळीची आठवण येते आणि भरकटलेले मन पुन्हा जाग्यावर येत जाणीव करून देते की, ‘मंग्या दिल्ली बहूत दूर है, बहोत कुछ करना बाकी है।’ औरंगाबादसारख्या शेततळ्यातून आलेल्या मला सामावून घेणाऱ्या ‘मुंबई’ला माझा सलाम.