सलाम त्यांच्या कार्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:06 AM2021-05-08T04:06:15+5:302021-05-08T04:06:15+5:30
भीतीला दूर सारून लढण्याचे बळ मिळाले! वीणा संखे (परिसेविका, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ठाणे जिल्हा सामान्य ...
भीतीला दूर सारून लढण्याचे बळ मिळाले!
वीणा संखे (परिसेविका, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय ज्यावेळी कोरोना रुग्णालय म्हणून जाहीर केले, त्यावेळी मनात भीती दाटून आली होती. कारण कोरोनाबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे अर्थात आमच्यावर दडपण होते; परंतु आमचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी धीर देऊन कोरोनाच्या कठीण काळात आम्हाला लढण्याची ताकद दिली.
मला अतिदक्षता विभागाचे प्रमुख करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात इतर आजार असलेले कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असत. या कोरोनाबाधित रुग्णांना धीर देण्यासाठी स्वतःला खचून चालणार नाही, हे मी मनाशी पक्के केले. उपचार घेऊन रुग्ण बरा होऊन घरी गेला की, एकीकडे मनस्वी आनंद होत असे, तर दुसरीकडे एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला की, प्रचंड दुःखही व्हायचे. या रुग्णांना पाहण्यासाठी नातेवाईकदेखील येऊ शकत नसल्याने आम्हीच त्यांचे नातेवाईक झालो होतो. एक ५० वर्षांचा रुग्ण रोज येता-जाता गप्पा मारायचा. एक दिवस मी त्याच्या जवळ उभी असताना माझे सहकारी त्याला उपचार देत होते आणि काही सेकंदात त्याचा मृत्यू झाला. आपल्यासमोरच एखाद्या रुग्णाचा मृत्यू होताना पाहणे खूप त्रासदायक असते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रचंड दबाव होता; परंतु दुसऱ्या लाटेत अनुभव आल्यामुळे रुग्णांना चांगले उपचार देऊन बरे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी दीड वर्षापासून अतिदक्षता विभागात काम करीत आहे; पण मला किंवा माझ्या कुटुंबाला अद्याप कोरोना झालेला नाही. मी एकही दिवस हॉटेलमध्ये राहिलेली नाही, मी रोज घरी ये-जा करीत असते, घरी माझी दोन मुले आहेत. त्यांनी आणि पतीने मला या संकटात लढण्याचे बळ दिले आहे. विशेष म्हणजे मी या दीड वर्षात एकदाही रजा घेतलेली नाही.
(शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे)
......................................
अहोरात्र रुग्णसेवा हेच आमचे कर्म
- ज्योती दीपक गुरव (परिसेविका, उपजिल्हा रुग्णालय पनवेल)
रुग्णसेवेचे व्रत घेतले असले तरी काेराेनामुळे सुरुवातीला आम्हीही घाबरून गेलाे हाेताे. मात्र, हार मानली नाही. गेले वर्षभर काेराेना रुग्णांची काळजी घेत आहाेत. त्यांना धीर देण्यापासून ते वैद्यकीय उपचारापर्यंतची जबाबदारी आपुलकीने पार पाडत आहाेत. पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करताना याचा सार्थ अभिमान वाटताे. चांगले टीम वर्क आहे. त्यामुळे काम करताना थकवा कधीच जाणवला नाही. कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जातात तेव्हा खूप माेठे समाधान मिळते.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात आमच्या रुग्णालयाची तातडीची बैठक झाली. आजपासून आपल्या हॉस्पिटलमध्ये कोविड पेशंट घेण्यात येणार असून, त्यासाठी मानसिकरीत्या तयार होण्यास आम्हाला सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी बाहेरच्या देशात खेळायला गेलेली क्रिकेट टीम रुग्णालयात दाखल झाली आणि कोविड रुग्णांवर उपचार करण्यास याच दिवसापासून सुरुवात झाली. सुरुवातीला घरी जायला वेळ मिळायचा नाही आणि कुटुंबाच्या काळजीपोटी दोन ते तीन महिने रुग्णालयापासून जवळच असलेल्या बी. पी. मरीन हॉस्टेलमध्ये राहिले. कुटुंबापासून दूर राहिल्याने दु:ख व्हायचे; पण रुग्णालयातील रुग्ण बरे होऊन घरी निघाले की होणारे दु:ख आनंदात परिवर्तित होत असे. कुटुंबाचाही खूप मोठा आधार मिळाला.
आज येथून पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे हाेऊन घरी गेले आहेत. यासाठी आमचे डॉ. बी. एस. लोहारे सरांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, परिचारिका, ऑफिस बॉय अशा १०० जणांच्या टीमने अव्याहत मेहनत घेतली. कोविड झालेल्या सहा जणींचे बाळंतपण सुखरूप केले. कोरोना बाळापर्यंत पोहोचला नाही, याचा खूप मोठा आनंद झाला होता. या काळात मीही चार दिवस आजारी पडले होते. माझ्या कुटुंबाने, सहकाऱ्यांनी धीर दिला. सुदैवाने माझा काेराेना रिपोर्ट निगेटिव्ह आला. आमच्याच रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले.
(शब्दांकन - अरुणकुमार मेहत्रे)
.....................................................
रणात आहोत झुंजणारे आम्ही !
- योगिता चव्हाण, (परिचारिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, वसई)
कोरोनाचा हा काळ म्हणजे हा संसर्ग रोखण्यासाठीची एक प्रकारची लढाईच आहे. आरोग्य क्षेत्रातील आमच्यासारखी सगळी मंडळी या लढाईत आपल्याला विजय मिळविण्यासाठी झुंज देत आहेत. कोरोना प्रादुर्भावाची भीती असताना, योग्य नियोजन करून आम्ही आमच्या जिवापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे मानून काम करीत आहोत. वसईतील प्राथमिक आरोग्य केंद्र, भाताने येथे मी गेल्या तीन वर्षांपासून परिचारिका म्हणून सेवा देत आहे. अनेक रुग्ण आमच्याकडे येतात, तेव्हा ते मनातून घाबरलेले असतात. रुग्णाला पहिल्यांदा आम्ही धीर देतो. मग त्यांच्यावर औषधोपचार सुरू करतो. सतत त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातील शंका आणि एकटेपणा घालविण्यासाठी प्रयत्न करतो.
आज वसई-विरार परिसरात, तसेच ग्रामीण भागात काम करीत असताना कोरोना रुग्णांशीच दररोज संपर्क येतो. लोक स्वतः बाधित होऊ नये यासाठी काळजी घेतात; परंतु आम्ही मात्र थेट दररोज मृत्यूलाच सामोरे जात असतो. या कोरोना काळात कर्तव्य महत्त्वाचे मानून रुग्णांची सेवा केली जात आहे. या काळात परिचारिका म्हणून काम करीत असताना कुटुंबाचीही काळजी वाटते. त्यासाठी महिन्यातून एकदाच कुटुंबाची भेट घेते. तेही स्वत:ला अलगीकरणात ठेवूनच; पण आता या कामात कुटुंब साथ देत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्यात वेगळीच हिंमत मिळते.
आपण जर नि:स्वार्थी भावनेने सेवा केली तर समाजही आपल्याला मदत करतो. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये भाताणे गावातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्रात केला होता. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव जोरात होत असल्याने नागरिकांनी कोरोनाबाबतचे नियम, अटींचे पालन करून स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यायला हवी. लक्षणे असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन कोरोना चाचणी करून घ्यावी. आपण जर सतर्क राहिलो तर नक्कीच या कोरोना संकटावर मात करू.
(शब्दांकन - सुनील घरत)
................................................
पहिलाच रुग्ण बरा झाला अन् आत्मविश्वास वाढला
- रोहिणी घुमे (परिचारिका, जसलोक रुग्णालय, मुंबई)
खरे तर मला शिक्षिका बनायचे होते; परंतु आईच्या इच्छेखातर मी परिचारिका झाले. परिचारिकेचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर १९९७ पासून आजतागायत रुग्णसेवा सुरूच आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून मी, माझी सहकारी श्रेया कोकाटे व आमच्या ११ जणांच्या टीमने जसलोक रुग्णालयातील कोरोना विभागाची जबाबदारी उचलली. सुरुवातीला रुग्णालयात ११ जणांची असणारी टीम आता ९८ जणांची झाली आहे. त्यावेळी जसलोक रुग्णालयातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. आम्हा मोजक्या जणांवर तेव्हा रुग्णालयाची जबाबदारी होती. सुरुवातीचा एक महिना आम्ही रुग्णालयातच राहत होतो. साहजिकच घरातही काही प्रमाणात भीतीचे वातावरण होते. या कोरोना काळात वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला, मग ते नवरा व बायकोचे नाते असेल किंवा आई व मुलांचे नाते. रुग्णालयात काम करीत असल्याने सार्वजनिक ठिकाणी गेल्यास लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा. सुरुवातीच्या काळात डॉक्टर व परिचारिकांमुळेच कोरोना पसरत असल्याचे अनेकांना वाटायचे, यामुळे नागरिक कौतुक करीत असले तरीदेखील त्यांच्या मनात भीती होतीच. त्यामुळे अद्याप आम्ही सार्वजनिक ठिकाणी सहभागी होत नाही.
कोरोनाचा पहिला रुग्ण रुग्णालयात आला, तो रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. मात्र, काही दिवसांतच तो रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतला. त्यामुळे आमच्या सर्व टीमचा आत्मविश्वास वाढला व आमचे टीम वर्क यशस्वी झाले, याचा आनंद झाला. कोरोनावर मात केल्याचा जेवढा आनंद रुग्णांना होतो तेवढाच आनंद आम्हालाही होतो. अनेकदा रुग्ण घरी परतल्यानंतरदेखील आम्ही त्यांना फोनवर औषधांविषयी, तसेच काळजी घेण्यासंबंधी मार्गदर्शन करतो.
(शब्दांकन : ओमकार गावंड)