मुंबई - भारतीय बनावटीच्या पहिल्या वेगवान वंदे भारत एक्स्प्रेसचं सारथ्य प्रथमच एका महिलेनं केलं. आशियातील पहिल्या महिला लोको पायलट राहिलेल्या सुरेखा यादव यांनी सोमवारी सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे चालविली. मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्स्प्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले. रेल्वे मुंबईला पोहोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरेखा यादव यांचा सत्कार करण्यात आला. आता, सुरेखा यादव यांचा वंदे भारत एक्सप्रेस कठीण घाटातून चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वंदे भारत ट्रेनच्या चालकास लोको पायलट म्हटले जाते, सोमवारी लोको पाललट बनून मूळच्या सातार कन्या असलेल्या सुरेखा यादव यांनी सोलापूर रेल्वे स्थानकाहून वेळेत प्रस्थान केलं. तर निर्धारीत वेळेपेक्षा ५ मिनिट अगोदर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठलं. यावेळी, नव्या युगातील हायस्पीड वंदे भारत रेल्वे चालवण्याची संधी आणि जबाबदारी दिल्याबद्दल रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांनी आभारही व्यक्त केले. दरम्यान, आता सुरखा यादव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये, मुंबईजवळी कठीण अशा घाटातून त्यांनी वंदे भारत एक्सप्रेस अगदी सफाईदारपणे चालवल्याचे दिसून येते. मराठमोळ्या महिलेनं या हायस्पीड रेल्वेचं सारथ्य केल्याचे व्हिडिओत प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळेच, हा व्हिडिओ नाराशक्ती या हॅशटॅगखाली शेअर करण्यात येत आहे.
सुरेखा यादव यांनी १९८८ मध्ये रेल्वे विभागात नोकरी जॉईन केली. त्यावेळी, आशियातील पहिली महिला लोको पायलट होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. आता, लोको पायलट प्रशिक्षक बनूनही त्या कार्यरत आहेत.