Join us

स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला सलाम, मॅरेथॉनमध्ये धावा बिनधास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 6:07 AM

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त धावा बिनधास्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : येत्या रविवारी ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘लोकमत’ महामुंबई महामॅरेथॉनमध्ये धावपटूंना देण्यात येणारी पदके वेगळे आकर्षण आहे. देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने महामॅरेथॉनची पदके देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यसेनानींनी बहुमूल्य योगदान दिले त्या महापुरुषांचे ऋण मान्य करून त्यांनाच समर्पित केली आहेत. पदकाच्या एका बाजूला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांची छायाचित्रे आहेत. 

रविवार, ४ डिसेंबर रोजी रेमंड ग्राऊंड येथे मोठ्या जल्लोषात, उत्साहात लोकमत महामुंबई महामॅरेथॉन होत आहे. या मॅरेथॉनच्या नोंदणीला प्रचंड संख्येने प्रतिसाद मिळत असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. धावपटूंचा उत्साह शिगेला पोहोचलला आहे. या धावपटूंना सन्मानित करताना प्रदान केल्या जाणाऱ्या पदकाबद्दल धावपटूंना आकर्षण आहे. महामॅरेथॉनचे पदक हे स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित करण्यात आले आहे. महामॅरेथॉनच्या संस्थापिका-संचालिका रुचिरा दर्डा यांच्या संकल्पनेतून या पदकाची निर्मिती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असून त्याअंतर्गत या महामॅरेथॉनचे आयोजन केले आहे. आपल्याला स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळेच असे मोकळेपणाने धावता येत आहे. त्यांच्या बलिदानाचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा गौरव करण्यासाठी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याचा गौरव करण्यासाठी तयार केलेले पदक औचित्यपूर्ण असल्याची भावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे. स्व. जवाहरलाल दर्डा यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन भारतीयांकरिता इंग्रजांविरुद्ध अथक लढा दिला आणि संघर्षमय वाटचालीतून लोकमत समूह निर्माण केला. तोच लोकमत आज महाराष्ट्रातील जनतेचा सर्वांत कणखर आवाज बनू शकला. प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांचा लोकमत समूहाला अभिमान असून ही महामॅरेथॉन पदके त्यांना समर्पित करण्यात आली आहे. त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज बिनधास्त धावू शकतो, अशा भावना रुचिरा दर्डा यांनी व्यक्त केल्या. 

 

टॅग्स :मुंबईमॅरेथॉन