मखमली सुरांना सलाम!
आपल्याला गाणे कळत असो वा नसो, सूरतालाची जाणकारी असो वा नसो, तरीही जे स्वर कानावर पडले की थेट हृदयाला जाऊन भिडतात आणि मनाला घट्ट धरून राहतात, अशा तेजस्वी स्वरांची महाराणी म्हणजे विख्यात गायिका आशा भोसले. राज्य सरकारने त्यांना गुरुवारी राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर केला. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
ही बातमी येताच, मरगळलेले, आक्रमक घटना, भीतिदायक आकडे यांनी ढेपाळलेले समाजमन एकदम प्रफुल्लित झाले. आशा भोसले या पंचाक्षरी मंत्राची जादूच तशी आहे. १९४३ सालापासून सुरू असलेला हा स्वरयज्ञ अखिल विश्वावर गारुड करून राहिला आहे. त्या स्वराला कसलेही बंधन नाही. त्याला कोणत्याही सीमा नाहीत. आहे तो फक्त प्रवाहीपणा, सातत्य. आशाताई असा उच्चार केला की आठवतात कितीतरी गाणी. मलमली तारुण्य माझे, ऋतू हिरवा, दिल चीज क्या है, मेरा कुछ सामान... एका गाण्यावरून दुसऱ्या गाण्यावर आपल्या मनातली रेकॉर्ड सुरू होते, अशी या सुरांची महती. त्या गाण्यांसोबतच समोर येतो हजार संकटे आली तरी त्यांचा खंबीरपणे सामना करणाऱ्या आशाताईंचा हसरा चेहरा. चांदणे शिंपीत जाणाऱ्या या स्वरांचा आजवर असंख्य पुरस्कारांनी सन्मान झालेला आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ‘पद्मविभूषण’ हा नागरी सन्मान त्यांना लाभला आहे. ‘लोकमत’नेही त्यांना ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. या सर्व सन्मानांचे मोल आहेच; पण ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार म्हणजे घरातल्या सानथोरांनी केलेले मायेचे कोडकौतुक आहे. मा. दीनानाथ मंगेशकर यांची ही कन्या. जन्म प्रतिभाशाली व्यक्तित्वांची खाण असलेल्या सांगलीचा. आशाताई आता नव्वदीच्या उंबरठ्यावर आहेत. याही वयात रंगमंचावर येऊन तो भारून टाकण्याचे दैवी बळ त्यांना लाभले आहे. त्या महाराष्ट्रातल्या घराघरातीलच एक आहेत. चित्रपटसृष्टीवर अखंड सात दशके अधिराज्य गाजवणाऱ्या या मखमली तारुण्याच्या मखमली सुरांनी आपले जगणे सुरेल केले आहे. आशाताईंना ‘लोकमत परिवारा’चा मानाचा मुजरा!