समलमान खानला शेतकरी आंदोलनाचा प्रश्न विचारला, भाईजान म्हणाला...
By महेश गलांडे | Published: February 5, 2021 10:10 AM2021-02-05T10:10:34+5:302021-02-05T10:12:17+5:30
गुरुवारी सलमान खान मुंबईतील एका म्युझिक शोच्या लाँचिंगसाठी आला होता, त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सलमानला प्रश्न विचारण्यात आला.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरला आहे. शेतकरी आंदोलनाला जागतिक स्तरावरून पाठिंबा मिळत असल्याचे काही ट्विटवरुन दिसून आले. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यासंदर्भात मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले परखड मत मांडले. त्यानंतर, गाणगोकिळा लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन सरकारच्या बाजुने आपलं मत मांडायला सुरुवात केली आहे. मात्र, काही सेलिब्रिटींची अद्यापही कीप सायलंट अशीच भूमिका आहे. पण, एका कार्यक्रमादरम्यान, पत्रकारांनी सलमान खानला बोलतं केलं.
गुरुवारी सलमान खान मुंबईतील एका म्युझिक शोच्या लाँचिंगसाठी आला होता, त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सलमानला प्रश्न विचारण्यात आला. देशातील शेतकरी आंदोलनावर अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्संने आपलं मत व्यक्त केलंय. त्यावर, आपली काय भूमिका? असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला होता. त्यावेळी, सलमानने बचावात्कम पवित्रा घेत समतोल उत्तर दिलंय. नक्कीच मी यासंदर्भात भाष्य करेल, जे योग्य आहे ते व्हायलाच हवं, उचित व्हायलाच हवं, बरोबर ते बरोबर व्हावे, सर्वांसाठी ! असे उत्तर सलमान खानने मीडियाशी बोलताना दिले. त्यामुळे, सलमानने दिलेल्या उत्तराचा नेमका अर्थ काढायचं काय, असा प्रश्न अनेकांना पडलाय. सलमानने ना थेट शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले, ना विरोध. त्यामुळे, सलमान बोल कर भी कुछ नही बोला... असंच म्हणावं लागेल. दरम्यान, अद्याप बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि मिस्टर परफेशनिस्ट आमीर खानने यासंदर्भात ट्विट किंवा भाष्य केलं नाही.
सोनू सूदचं ट्विट
पडद्यावर व्हिलनची भूमिका साकारणारा आणि लॉकडाऊन काळातील कामामुळे खरा हिरो ठरलेल्या अभिनेता सोनू सूदचे ट्विट म्हणजे कुणाला तरी मदत, किंवा कुणाची तरी वेदना जाणणारे असते. मात्र, यावेळी सोनू सूदने केलेले ट्विट वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. कारण, गेल्या 69 दिवसांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काही विदेशी कलाकारांनी ट्विट केले होते. त्यानंतर, हा आमच्या देशातील विषय असून इतरांनी आम्हाला धडे देऊ नयेत, असे देशातील दिग्गजांनी ट्विटरवरुन सुनावले आहे. मात्र, अभिनेत्री तापसी पन्नूने एक ट्विट करुन सर्वांनाचा आरसा दाखवला होता. आता, सोनू सूदनेही वनलाईन ट्विट करुन सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे. चुकीच्या गोष्टीला बरोबर म्हणाल, तर झोप कशी येईल? असे ट्विट सोनूने केले आहे. सोनूच्या या ट्विटचं अनेकांनी कौतुक केलंय.
रिहाना अन् मीना हॅरीस यांचं ट्विट
आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाने ट्विटरवरून शेतकरी आंदोलनाबाबत आपण का बोलत नाही? असा सवाल केला त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची चर्चा झाली. रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. मीना हॅरिसनं लिहिलं की, आपण सगळ्यांनी भारतात इंटरनेट शटडाऊन आणि शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा हिंसाचार याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. ट्विटरवरून गेल्या २४ तासांत रिहानाच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केलं आहे.
सचिन तेंडुलकर म्हणतो
सचिन तेंडुलकरने ट्विट करत, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. मात्र, हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. देश म्हणून आपण सर्वजण एकत्र राहू, असे ट्विट सचिनने केले. या ट्विटसोबत #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही सचिनने वापरले आहेत. त्यानंतर, विराट कोहली, रोहित शर्मा, अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांनीही ट्विट करुन हा Propaganda भारतविरोधी असल्याची भूमिका घेतली. शेतकरी आंदोलनावरुन सुरु झालेल्या ट्विटर वॉरवर आता इतरही सेलिब्रिटी मैदानात उतरुन आपलं मत मांडत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचं ट्विट
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की, भारताच्या संसदेने व्यापक चर्चा आणि संवादानंतर कृषी क्षेत्राच्या संबंधित सुधारणा करणारे कायदे मंजूर केले आहेत. हा कायद्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लवचिकता आणि विस्तीर्ण बाजारपेठ मिळू शकेल. ही सुधारणा आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत शेतीचा मार्ग आहेत. भारतातील काही भागातील शेतकऱ्यांचा छोटा गट या सुधारणांशी सहमत नाही. भारत सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद सुरू केला आहे. या प्रयत्नात आतापर्यंत अकरा फेऱ्या झाल्या आहेत. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री सहभाग घेत आहेत, केवळ सरकारच नाही,तर पंतप्रधानांकडूनही कृषी कायद्याला स्थगित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करताना #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropagenda हा हॅशटॅग वापरला आहे.