Join us

भाजपातील मेगाभरतीवर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला म्हणून बरं अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 7:26 AM

भाजप संघाला आणि संघटनेला महत्त्व देतो. राजकारणात काही गोष्टी अपरिहार्य ठरतात

मुंबई - भारतीय जनता पक्ष म्हणजे काही धर्मशाळा नाही, असे बाणेदार वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपमध्ये सध्या जी मेगा भरती सुरू आहे, त्या भरतीसंदर्भात जे प्रश्न उठत आहेत, त्यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला हे बरे झाले. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणे जाहीर केले आहे की, भाजप म्हणजे काही धर्मशाळा नाही, जिथे कुणीही उठावे आणि यावे. हा जनतेचा पक्ष आहे. जे चांगले काम करतात त्यांचे स्वागत आहे. येणाऱयांचे कार्य, कर्तृत्व आणि स्थान पाहूनच पक्षात प्रवेश दिला जात आहे, असे मुख्यमंत्री सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. म्हणजे आता काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षांतून जे लोक घेतले आहेत त्यांचे कार्य, कर्तृत्व आणि चारित्र्य चमकदार असल्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांनी दिले आहे अशा शब्दात शिवसेनेने भाजपातील पक्षप्रवेशावर भाष्य केलं आहे. 

काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेतून बरेच लोक भाजपच्या पक्क्या घरात प्रवेश करीत आहेत. ते सर्व कर्तबगार, कार्यमग्न लोक आहेत. आधीच्या धर्मशाळेत त्यांचे कार्य व कर्तबगारीस कुणी विचारीत नव्हते. आता नव्या घरात त्यांच्या कर्तृत्वाची गुढी अधिक उंचावेल असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. 

सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे 

  • भाजप म्हणजे तात्पुरते ‘बूड’ टेकवून पुढे निघून जाण्याची व्यवस्था नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे पक्ष मधल्या काळात धर्मशाळाच झाल्या. त्या धर्मशाळेतील बरेच लोक भाजपच्या पक्क्या आणि कायमस्वरूपी घरात आले व मुख्यमंत्र्यांनी त्यांना घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम पार पाडला.
  • पक्ष प्रवेश सोहळा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’ची खरी सुरुवात आहे. हे चित्र तसे गमतीचे आहे. 
  • भाजपमध्ये प्रवेश करताना म्हणे आमदार कोळंबकरांचे डोळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आठवणीने पाणावले व त्यांना टी.व्ही. कॅमेऱयासमोरच हुंदके फुटले. कोळंबकर हे शिवसेनेत आमदार व मंत्री होते. ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले व आता भाजपवासी झाले. 
  • शिवसेना सोडून मोठा कालखंड लोटला आहे. कोळंबकर विधानसभेची जी जागा लढवत आहेत ती ‘युती’मध्ये शिवसेनेच्या वाटय़ाला आहे. त्यांना शिवसेनाप्रमुखांविषयी इतकाच जिव्हाळा होता तर त्यांनी शिवसेनेची वाट धरायला हवी होती. 
  • त्यामुळे त्यांचे अश्रू कुणालाही विचलित करू शकत नाहीत. विरोधी आमदारांची कामे सत्ताधारी होऊ देत नाहीत म्हणून पक्ष बदलायचे या सबबी आता जुन्या झाल्या. 
  • पिचड यांनी तर स्पष्ट सांगितले की, ‘देश ज्या बाजूला आहे, महाराष्ट्र ज्या बाजूला आहे, त्या बाजूला गेले पाहिजे हा आमचा मार्ग आहे.’ राधाकृष्ण विखे पाटील यांनीच हा मार्ग दाखवल्याचे गुपितही पिचडांनी फोडले आहे. 
  • मुख्यमंत्री म्हणतात की, भाजप म्हणजे धर्मशाळा नाही. भाजप हा एक तत्त्व, नीतिमत्ता, पारदर्शक विचारांचा पक्ष आहे. भाजप संघाला आणि संघटनेला महत्त्व देतो. राजकारणात काही गोष्टी अपरिहार्य ठरतात, पण ‘रंगुनी रंगात साऱया रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱया पाय माझा मोकळा’ असे अनेकदा वागावे लागते. 
  • फडणवीस यांनी सर्व गुंते सोडवून स्वतःला मोकळे ठेवले. ‘ईडी’ वगैरेंची चौकशी चालू असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही, असे सांगून त्यांनी भुजबळांसारख्यांचा भाजप प्रवेशाचा दरवाजा दाणकन बंद केला.  

 

टॅग्स :शिवसेनाभाजपाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस