संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 04:53 PM2018-11-30T16:53:21+5:302018-11-30T17:01:54+5:30
औरंगाबादमध्ये ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळाव्याची हाक देत संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.
मुंबई - औरंगाबादमध्ये ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळाव्याची हाक देत संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी (30 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक कपिल डोके यांनी ही माहिती दिली.
सत्ताधारी किंवा विरोधकांना शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत. मेलेल्या वाघिणीच्या विषयावर राजकारण होते, मात्र स्वतःचे सरण रचून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांवर चर्चा करण्यासाठी प्रस्थापित पक्षांकडे वेळ नाही असं डोके यांनी म्हटलं आहे. तरूणांच्या रोजगाराऐवजी शहरांचे नावे बदलण्यात सरकार व्यस्त आहे. म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्रात जनतेसाठी संभाजी ब्रिगेड हा सक्षम पर्याय असल्याचा दावा ढोके यांनी केला आहे.
लोकसभेच्या ३० जागा आणि विधानसभेच्या १०० जागा लढणार असल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले. आगामी निवडणुकीचं बिगुल फुंकण्यासाठी ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात पुढील वाटचालीबाबत सखोल मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बऱ्याच मतदार संघात स्वबळावर लढण्याची तयारी आहे. समविचारी पक्षांशिवाय कोणत्याही प्रस्थापित पक्षासोबत जाणार नसल्याचे ब्रिगेडने स्पष्ट केले.