मुंबई/कोल्हापूर- राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील तिढा कायम आहे. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सोमवारी याबाबत निर्णय होऊ शकला नाही. शिवबंधन बांधून शिवसेनेतर्फे निवडणूक लढणार नाही, या आपल्या भूमिकेवर संभाजीराजे ठाम राहिल्याने शिवसेनेने दुसरा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
संभाजीराजे छत्रपती Sambhaji Raje Chhatrapati कोल्हापूरहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. त्यांनी याआधी माध्यमांशी संवाद साधत मोजकीच प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्मान राखतील अशी अपेक्षा असल्याचं, मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झालीय. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढे काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.
"संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर बोलावणं म्हणजे खुद्द छत्रपतींचा अपमान"
संभाजीराजे यांनी पॅलेसमध्ये आज मालोजीराजे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. संभाजीराजेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत आता पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे आजच मुंबईत दाखल होणार आहेत.
दरम्यान, संभाजीराजे यांनी पक्षप्रवेश केल्यास उमेदवारी देण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. शिवबंधन बांधण्यासाठी ‘मातोश्री’वर या, असा निरोपही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने संभाजीराजे यांना दिला होता. त्यासाठी दुपारी साडेबारापर्यंतची मुदतही दिली होती. संभाजीराजे यांनी पक्षप्रवेश न केल्यास सायंकाळपर्यंत शिवसेना दुसरा उमेदवार जाहीर करील, असेही सांगितले होते. संभाजीराजे यांनी सोमवारी मात्र ‘मातोश्री’वर न जाता कोल्हापूरला जाणे पसंत केले होते.
महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून लढण्याची तयारी-
शिवसेना पक्षप्रवेशाऐवजी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. मात्र, दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने ना पक्षप्रवेशाचा सोहळा झाला, ना उमेदवारीची घोषणा झाली. दोन्ही बाजूंनी चर्चेची दारे पूर्ण बंद झालेली नाहीत.