मुंबई- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असतानाही त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी (Dhananjay Mahadik) बाजी मारली. मात्र शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले.
राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे.
शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll, असं संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या चांगलीच हवा तापली होती. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीला निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर कुठल्याही पक्षानं संभाजीराजेंबाबत ठोस भूमिका न घेतल्यानं त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली.
दरम्यान, महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. सहाव्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला. तर शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली.
निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला विजय?-
राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर दबाव टाकून भाजपने विजय मिळविल्याची टीका केली आहे. "भाजपने नक्कीच जागा जिंकली, पण मी त्यांचा विजय मानायला तयार नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक ३३ मतं संजय पवारांना आहेत, तर भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं आहेत. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे, हे मान्य आहे. पण भाजपचा दणदणीत विजय झाला, हे चित्र साफ झूट आहे. भाजपने माझं मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला आलाय विजय?" असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.