मुंबई - संभाजीराजे नाव घेतलं किंवा ऐकलं तरी मराठा आरक्षण हेच चित्र सध्या आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. राजकारणी, खासदार आणि छत्रपती घराण्याचे वारसदार असलेले मराठा आंदोलकाचे नेते अशीच संभाजीराजेंची प्रतिमा जनमानसांत आहे. मात्र, लोकमतने संभाजीराजेंची वेगळी कथा जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय. संभाजीराजेंच्या बालपणापासून, शालेयजीवनापासून ते आजमित्तीस सुरू असलेल्या त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू थेट मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे संभाजीराजेंनीही प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तरे दिली आहेत.
संभाजीराजेंनी लोकमतला दिलेल्या मुलाखतील आपल्या शालेय जीवनातील, महाविद्यालयीन जीवनातील, राजघराण्यातील अनेक किस्से शेअर केले. त्यामध्ये, त्यांच्या लग्नाचीही प्रेमळ गोष्ट त्यांनी सांगितली. त्यामुळेच, राजकारणापलिकडे संभाजीराजे आणि मराठा आंदोलना व्यतिरिक्त असलेलल्या संभाजीराजेंना बोलता करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
खासदार संभाजीराजेंना त्यांच्या लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. आपल लग्न लव्ह मॅरेज झालं की अरेंज?. त्यावर, संभाजीराजेंनी दिलखुलासपणे उत्तर दिलंय. तसं पाहिलं तर ते अरेंज मॅरेजच होतं. आमच्या वडिलांनी सांगितलं होतं, तुमचं वय आता 24 झालंय, यंदा लग्नं करायचं आहे. पद्माराजे याच्यानंतरचं हे घरातलं पहिलंच लग्न होतं, त्यामुळे हे लग्न कोल्हापुरात व्हावं अशी वडिलांची इच्छा होती. त्यासाठी, त्यांनी मला मुलगी पसंत करण्यासाठी 1 वर्षाचा वेळ दिला होता.
संयोगिताराजे यांना आम्ही पाहिलं, नागपूरच्या कल्पनाराजे यांना मुलगी पसंत असल्याचं मी सांगितलं. मात्र, त्यांचं 18 वर्षे पूर्ण नसल्यामुळे लग्नासाठी काही काळ थांबावं लागलं. मला भरपूर प्रपोजल आले, पण मला काही आवडले नाहीत. त्यामुळेच, लग्न करायचं असेल तर त्यांच्याशीच असं मी ठरवलं. त्यानुसार साखरपुडा अंडरएज असतानाच झाला, तर जानेवारी महिन्यात त्यांना 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आमचं लग्न झालं, असा संभाजीराजेंच्या लग्नाचा प्रेमळ किस्सा त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.