Sambhaji Raje Exclusive: खासदार होण्याचा निर्णय शाहू महाराजांना आवडला नाही, संभाजीराजेंनी सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 03:19 PM2021-07-15T15:19:39+5:302021-07-15T15:20:05+5:30
संभाजीराजे हे छत्रपतींच्या घराण्याचे वारस आहेत. त्यामुळेच, त्यांच्या पूर्वजांचा आणि घराण्यातील वडिलधारी मंडळींचा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो. यासंदर्भात संभाजीराजेंना प्रश्न विचारला होता
मुंबई - संभाजीराजे नाव घेतलं किंवा ऐकलं तरी मराठा आरक्षण हेच चित्र सध्या आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. राजकारणी, खासदार आणि छत्रपती घराण्याचे वारसदार असलेले मराठा आंदोलकाचे नेते अशीच संभाजीराजेंची प्रतिमा जनमानसांत आहे. लोकमतने संभाजीराजेंची वेगळी कथा जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू उलगडण्यात आले आहेत. त्यात, संभाजीराजेंचा शालेय जीवनापासून ते खासदारकीपर्यंतचा प्रवास आणि मराठा आरक्षण आंदोलन इथंपर्यंत त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत.
संभाजीराजे हे छत्रपतींच्या घराण्याचे वारस आहेत. त्यामुळेच, त्यांच्या पूर्वजांचा आणि घराण्यातील वडिलधारी मंडळींचा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो. यासंदर्भात संभाजीराजेंना प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना संभाजीराजेंनी हे घराण्याचे संस्कार असल्याचं सांगितलं. तसेच, खासदरपदी नियुक्ती होतानाचा किस्साही सांगितला. प्रभाव म्हणण्यापेक्षा आमच्यावर घराण्याचे संस्कार आहेत, घराण्याची विचारधारा आहे. त्यामुळे, वडिलांचा आमच्यावर प्रभाव आहे, यापेक्षा ही घराण्याची एक पद्धत आहे, त्यानुसार आम्हाला वागावे लागते. मी खासदार होताना वडिलांना ते आवडलं नाही. कारण, ती त्यांची आयडॉलॉजी नाही, मी ते स्विकारतो का, त्यामध्ये जाईल का.. असं त्यांना वाटत असेल, असे संभाजीराजेंनी सांगितलं.
मी खासदार होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला होता. देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार होण्याचा आग्रह केला, आपल्या घराण्याला तो सन्मान देण्याची आमची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यावेळी, राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याने खासदारकी स्विकारताना पक्षाची कुठलिही बंधन नकोत, असं स्पष्ट केलं होतं. त्यावेळी, मोदींनीही आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार आहात, त्याच पद्धतीने काम करा, असे मान्य केल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले.
उदयनराजेंबद्दल संभाजीराजे म्हणतात
उदयनराजेंची आणि माझी भेट होते, ती आमची फॉर्मल भेट असते. उदयनराजेंची त्यांची स्टाईल आहे, माझी माझी स्टाईल आहे. उदयनराजेंची कॉलर वर असते, आमची कॉलर शक्यतो वर येत नाही. पण, ज्यावेळी कॉलर वर आणायची असेल, त्यावेळी संभाजीराजेही काही कमी पडत नाहीत, असे संभाजीराजेंनी म्हटले. वेळ पडल्यावर केव्हा आवाज वाढवायचा, केव्हा मूव्हमेंट वाढवायची, केव्हा मूव्हमेट हातात घ्यायची हे मला बरोबर कळतं, असेही संभाजीराजेंनी म्हटले.
संभाजीराजेंच्या लग्नाची गोष्ट
खासदार संभाजीराजेंना त्यांच्या लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. आपल लग्न लव्ह मॅरेज झालं की अरेंज?. त्यावर, संभाजीराजेंनी दिलखुलासपणे उत्तर दिलंय. तसं पाहिलं तर ते अरेंज मॅरेजच होतं. आमच्या वडिलांनी सांगितलं होतं, तुमचं वय आता 24 झालंय, यंदा लग्नं करायचं आहे. पद्माराजे याच्यानंतरचं हे घरातलं पहिलंच लग्न होतं, त्यामुळे हे लग्न कोल्हापुरात व्हावं अशी वडिलांची इच्छा होती. त्यासाठी, त्यांनी मला मुलगी पसंत करण्यासाठी 1 वर्षाचा वेळ दिला होता. संयोगिताराजे यांना आम्ही पाहिलं, नागपूरच्या कल्पनाराजे यांना मुलगी पसंत असल्याचं मी सांगितलं. मात्र, त्यांचं 18 वर्षे पूर्ण नसल्यामुळे लग्नासाठी काही काळ थांबावं लागलं. मला भरपूर प्रपोजल आले, पण मला काही आवडले नाहीत. त्यामुळेच, लग्न करायचं असेल तर त्यांच्याशीच असं मी ठरवलं. त्यानुसार साखरपुडा अंडरएज असतानाच झाला, तर जानेवारी महिन्यात त्यांना 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आमचं लग्न झालं, असा संभाजीराजेंच्या लग्नाचा प्रेमळ किस्सा त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.