मुंबई - संभाजीराजे नाव घेतलं किंवा ऐकलं तरी मराठा आरक्षण हेच चित्र सध्या आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. राजकारणी, खासदार आणि छत्रपती घराण्याचे वारसदार असलेले मराठा आंदोलकाचे नेते अशीच संभाजीराजेंची प्रतिमा जनमानसांत आहे. मात्र, लोकमतने संभाजीराजेंची वेगळी कथा जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू उलगडण्यात आले आहेत. तसेच, उदनयराजेंबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही, संभाजीराजेंनी थेट उत्तर दिलंय.
संभाजीराजेंच्या बालपणापासून, शालेयजीवनापासून ते आजमित्तीस सुरू असलेल्या त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू थेट मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे संभाजीराजेंनीही प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तरे दिली आहेत. सातारा आणि कोल्हापूर परसर म्हटलं की खासदार उदयनराजेंचं नाव निघतंच. त्यामुळे, उदयनराजेंबद्दलही संभाजीराजेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, संभाजीराजेंनी दोन्ही राजेंमधील फरक आणि स्वभाव आपल्या शब्दात व्यक्त केला.
उदयनराजेंची आणि माझी भेट होते, ती आमची फॉर्मल भेट असते. उदयनराजेंची त्यांची स्टाईल आहे, माझी माझी स्टाईल आहे. उदयनराजेंची कॉलर वर असते, आमची कॉलर शक्यतो वर येत नाही. पण, ज्यावेळी कॉलर वर आणायची असेल, त्यावेळी संभाजीराजेही काही कमी पडत नाहीत, असे संभाजीराजेंनी म्हटले. वेळ पडल्यावर केव्हा आवाज वाढवायचा, केव्हा मूव्हमेंट वाढवायची, केव्हा मूव्हमेट हातात घ्यायची हे मला बरोबर कळतं, असेही संभाजीराजेंनी म्हटले.
संभाजीराजेंच्या लग्नाची गोष्ट
खासदार संभाजीराजेंना त्यांच्या लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. आपल लग्न लव्ह मॅरेज झालं की अरेंज?. त्यावर, संभाजीराजेंनी दिलखुलासपणे उत्तर दिलंय. तसं पाहिलं तर ते अरेंज मॅरेजच होतं. आमच्या वडिलांनी सांगितलं होतं, तुमचं वय आता 24 झालंय, यंदा लग्नं करायचं आहे. पद्माराजे याच्यानंतरचं हे घरातलं पहिलंच लग्न होतं, त्यामुळे हे लग्न कोल्हापुरात व्हावं अशी वडिलांची इच्छा होती. त्यासाठी, त्यांनी मला मुलगी पसंत करण्यासाठी 1 वर्षाचा वेळ दिला होता. संयोगिताराजे यांना आम्ही पाहिलं, नागपूरच्या कल्पनाराजे यांना मुलगी पसंत असल्याचं मी सांगितलं. मात्र, त्यांचं 18 वर्षे पूर्ण नसल्यामुळे लग्नासाठी काही काळ थांबावं लागलं. मला भरपूर प्रपोजल आले, पण मला काही आवडले नाहीत. त्यामुळेच, लग्न करायचं असेल तर त्यांच्याशीच असं मी ठरवलं. त्यानुसार साखरपुडा अंडरएज असतानाच झाला, तर जानेवारी महिन्यात त्यांना 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आमचं लग्न झालं, असा संभाजीराजेंच्या लग्नाचा प्रेमळ किस्सा त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.