मुंबई - स्वराज्य संघटनेचे संस्थापक प्रमुख संभाजीराजे भोसले यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नसल्याचं म्हटलं. अनेक लोक म्हणतात की, एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार; पण मी चॅलेंज देऊन सांगतो की, अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे संभाजीराजेंनी म्हटलं होतं. त्यावर, आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजेंनी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाचा प्रथम वर्धापन दिन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचाअजित पवार गट महायुतीत सामील झाल्याने संभाजीराजेंनी यावेळी प्रामुख्याने भाजपला लक्ष्य केले. तसेच, अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाही हे मी चॅलेंज देऊन सांगतो, असेही त्यांनी म्हटलं.
संभाजीराजेंनी अजित पवारांबद्दल केलेल्या विधानावर आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, संभाजीराजेंनी केलेल्या विधानावर मी काय बोलणार, तो त्यांचा विषय आहे. पण, ते काही प्रमाणात भाजपाच्या जवळ आहेतच, भाजपानेच त्यांना संदेश दिला असावा, असं मला वाटतं. त्यामुळे, त्यावर मी काही जास्त बोलणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार यांनी यावर मी काय बोलणार असे म्हटले. पण, संभाजीराजेंना भाजपानेच हा संदेश दिला असल्याचे म्हणत एकप्रकारे ते भाजपाचेच ऐकतात, असा तिरकस बाण मारला.
लोकसभेपुरतेच एकत्र
ज्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करत होते, त्यांनाच आता सोबत घेतले आहे. राज्यातील जनतेची अशा युतीने मती गुंग झाली आहे; पण हे तीन पक्ष भविष्यात एकत्र राहणार नाहीत. हे पक्ष लोकसभेपुरते एकत्र आले आहेत. कदाचित लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार गट पुन्हा शरद पवार गटात सामील होईल, असे भाकीतही त्यांनी केले. या राजकीय परिस्थितीच्या विरोधात स्वराज्य पक्ष लढा देईल, असेही त्यांनी म्हटले.