Join us

आरक्षणासाठी संभाजी राजे यांनी राजसत्तेत यावे - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:06 AM

आरक्षणासाठी संभाजी राजे यांनी राजसत्तेत यावेप्रकाश आंबेडकर; आरक्षणवादी शक्तींना एकत्र करण्याचे केले आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

आरक्षणासाठी संभाजी राजे यांनी राजसत्तेत यावे

प्रकाश आंबेडकर; आरक्षणवादी शक्तींना एकत्र करण्याचे केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर खासदार संभाजी राजे यांनी सक्रिय राजकारणात यावे. सर्व आरक्षणवादी शक्तींना सोबत घेऊन राजसत्ता मिळविल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मांडली.

प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासह ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत भाष्य केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंबेडकर यांनी यापूर्वीच संभाजी राजे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, कोल्हापूर येथील मूक मोर्चातही ते सामील झाले होते. राजसत्तेत आल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे राज्यातील सर्व आरक्षणवादी शक्तींना सोबत घेऊन संभाजी राजे यांनी राजकारणात सक्रिय झाले पाहिजे. राजसत्तेत आल्यावरच मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाला सांगता येईल. ७० वर्षातील मागच्या निकालांनी जी स्थिती निर्माण झाली त्यातून मार्ग काढण्याची विनंती करता येईल, असे आंबेडकर म्हणाले. संभाजी राजे यांनी याबाबत भूमिका घेतल्यास आम्हीही सोबत असू असेही ते म्हणाले.

दरम्यान, आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात धार्मिक तेढ निर्माण केली जाण्याची शक्यता आहे. चिथावणीखोर भाषा, कृत्ये घडू शकतात. त्यामुळे शांतता राखण्याच्या दृष्टीने विशेष कायदा करण्याची आवश्यकता व्यक्त करत आंबेडकर यांनी एका विधेयकाचा मसुदाही जाहीर केला. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशची निवडणूक केंद्रातील भाजपसाठी महत्त्वाची बनली आहे. त्यातच मोदी सरकारची लोकप्रियता कमी झाल्याने दोन्ही बाजूने तेढ निर्माण करण्याची शक्यताही आंबेडकर यांनी व्यक्त केली.

...तर सर्वात आधी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा!

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी घेतलेल्या आंदोलनाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. न्यायालयात हे प्रकरण सुरू होते, युक्तिवाद चालू होता तेेव्हा हे मंत्री कुठे होते, काय करत होते, असा प्रश्न करतानाच एकीकडे मंत्री पदे भोगायची आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आंदोलनाची भाषा करायची. ओबीसी आरक्षणाबाबत हे नेते प्रामाणिक असतील तर त्यांनी आधी आपल्या मंत्री पदांचा राजीनामा द्यावा. राजीनामे दिले तरच त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध होईल, असे आंबेडकर म्हणाले.

..........................................