दगाफटका झाला, संभाजीराजे समर्थकांचा पत्रकार परिषदेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 09:02 AM2022-05-25T09:02:19+5:302022-05-25T09:13:31+5:30

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा

Sambhaji Raje supporters accused in a press conference | दगाफटका झाला, संभाजीराजे समर्थकांचा पत्रकार परिषदेत आरोप

दगाफटका झाला, संभाजीराजे समर्थकांचा पत्रकार परिषदेत आरोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाठिंबा देण्याचे कबूल करूनही संभाजीराजे छत्रपती यांना दगाफटका करण्यात आल्याचा आरोप संभाजीराजे यांच्या समर्थकांनी आणि मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी रात्री केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच याला कारणीभूत असल्याचे सांगत मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला.

राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संजय पवार यांचे नाव निश्चित केले. त्यानंतर सायंकाळी विविध मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी मुंबईत संभाजीराजे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना या प्रतिनिधींनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर खापर फोडले. शरद पवार यांनी सुरुवातीला संभाजीराजे यांना पाठिंबा दिला होता, तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पुरस्कृत उमेदवारीला मान्यता दिली होती. संभाजीराजे यांना शिवबंधन बांधण्यास अडचण असल्यास पुढे कोणत्या पद्धतीने काम करायचे, याचा मसुदाही अंतिम करण्यात आला होता. या मुसद्यालाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंजुरी दिली होती. अटी मान्य झाल्याचे सांगितले गेले होते. मात्र, ऐनवेळी यात झालेला बदल हे राऊत यांचे पाप आहे, असा आरोप छावा संघटनेचे धनंजय जाधव यांनी केला.

पुरस्कृत उमेदवार आणि पुढील वाटचालीचा मसुदा सर्वसहमतीने बनविला होता. शिवसेनेचे नेत्यांचे शिष्टमंडळही राजेंना भेटले होते. मसुदा कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्यावर नक्की झाला, त्यावेळी काय चर्चा झाली, संबंधित मंत्र्यांनी घेतलेले आडेवेढे त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनी मसुद्याला दिलेली मान्यता याचा मी साक्षीदार आहे. याचे सर्व पुरावे, फोटो आमच्याकडे आहेत. योग्यवेळी ते माध्यमांसमोर मांडू, असा इशाराही जाधव यांनी दिला.

  

शरद पवार यांना त्यांच्यावर सतत होणारा विश्वासघाताचा आरोप पुसण्याची संधी आहे. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनीही दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन समर्थकांनी केले. तर शिवसेना किंवा महाविकास आघाडीने काहीही भूमिका घेतली तरी आमची तयारी झालेली आहे. आमचा विजय नक्की आहे, असा दावाही समर्थकांनी केला. शिवसेनेकडे ५५ मते आहेत. मग दुसरी जागा निवडून आणण्याची भाषा शिवसेना कशी काय करते, त्यासाठी ८४ जागा लागतात. ही जागा शिवसेनेची अथवा महाविकास आघाडीची नव्हती. त्यामुळे सर्व पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवत संभाजीराजे यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहनही विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केले.

Web Title: Sambhaji Raje supporters accused in a press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.