छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:01 AM2024-10-07T06:01:09+5:302024-10-07T06:01:53+5:30
दोन अडीच तास आम्ही समुद्रात फिरलो पण शिवाजी महाराजांचे स्मारक कुठेच दिसले नाही. मोदींनी शिवस्मारकाचे भूमिपजून केले. मग स्मारक का उभे राहिले नाही?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते अरबी समुद्रात भूमिपूजन झालेल्या शिवस्मारकाचे काय झाले? गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभे राहिले, मग छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कधी होणार? असे सवाल करत संभाजीराजे यांनी मुंबईतील अरबी समुद्रात रविवारी आंदोलन केले.
अरबी समुद्रात जिथे मोदींच्या हस्ते जलपूजन करून शिवस्मारकाचे भूमिपजून करण्यात आले होते, तिथेच बोटीने जाऊन संभाजीराजेंनी दुर्बिणीतून स्मारकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर संभाजीराजेंनी केलेल्या पहिल्याच आंदोलनात भाजपला टार्गेट केले आहे. त्यासाठी "चला शिवस्मारक शोधायला" या आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आणि त्यानुसार ते रविवारी समर्थकांसह मुंबईत येऊन धडकले.
दोन तास समुद्रात फिरलो, पण स्मारक दिसले नाही
दोन अडीच तास आम्ही समुद्रात फिरलो पण शिवाजी महाराजांचे स्मारक कुठेच दिसले नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणूक लक्षात घेऊन एक महिन्याच्या आधी मोदींनी शिवस्मारकाचे भूमिपजून केले. मग स्मारक का उभे राहिले नाही? घाईगडबडीत पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करणे हा लोकांच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांच्या नावे भरपूर राजकारण झाले, शिवाजी महाराजांच्या नावाने खोटे चालणार नाही, भरपूर झाले आता महाराजांच्या राजकारण करूनच दाखवा, असा इशारा संभाजीराजे यांनी यावेळी भाजपला दिला. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र समुद्रातील हे स्मारक अद्यापही कुठे दिसत नाही. म्हणून शिवस्मारक शोधण्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली होती.
पोलिस आणि कार्यकर्त्यांत झटापट : संभाजीराजे कार्यकर्त्यासह मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात दाखल झाले असता पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. त्यावेळी पोलिस आणि स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांकडून स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.