Join us

संभाजीराजे शिवबंधन बांधणार नाहीत, दुसऱ्या उमेदवारासाठी शिवसेनेचा शाेध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 9:14 AM

दुसऱ्या उमेदवारासाठी शिवसेनेचा शाेध

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील तिढा कायम आहे. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सोमवारी याबाबत निर्णय होऊ शकला नाही. शिवबंधन बांधून शिवसेनेतर्फे निवडणूक लढणार नाही, या आपल्या भूमिकेवर संभाजीराजे ठाम राहिल्याने शिवसेनेने दुसरा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.  

संभाजीराजे यांनी पक्षप्रवेश केल्यास उमेदवारी देण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. शिवबंधन बांधण्यासाठी ‘मातोश्री’वर या, असा निरोपही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने संभाजीराजे यांना दिला होता. त्यासाठी दुपारी साडेबारापर्यंतची मुदतही दिली होती. संभाजीराजे यांनी पक्षप्रवेश न केल्यास सायंकाळपर्यंत शिवसेना दुसरा उमेदवार जाहीर करील, असेही सांगितले होते. संभाजीराजे यांनी मात्र ‘मातोश्री’वर न जाता कोल्हापूरला जाणे पसंत केले. मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चेनंतरच ते भूमिका निश्चित करतील असे समजते . 

दोन जागा निवडून येण्याचा शिवसेनेला विश्वासn राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या संभाजीराजे यांनी ४२ मतांची तजवीज केली का, असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. n आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, शिवसेना दोन जागा लढवेल. राजेंना आमचा विरोध नसल्याचे सांगतानाच शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून लढण्याची तयारी शिवसेना पक्षप्रवेशाऐवजी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. मात्र, दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने ना पक्षप्रवेशाचा सोहळा झाला, ना उमेदवारीची घोषणा झाली. दोन्ही बाजूंनी चर्चेची दारे पूर्ण बंद झालेली नाहीत.

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीमुंबईशिवसेनाराज्यसभा