Join us

संभाजीनगर पालिकेला उभारायचा आहे मुंबई पालिकेसारखा आपत्कालीन नियंत्रण कक्ष

By जयंत होवाळ | Published: July 02, 2024 8:38 PM

या कक्षाचे कामकाज पाहून छत्रपती संभाजी नगर महापालिकेचे अधिकारी अवाक झाले.

जयंत होवाळ,  लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत घडणाऱ्या घटनांची माहिती संकलित करून तात्काळ उपाय योजना करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेचा आप्तकालीन कक्ष कार्यरत असतो.२४ तास कार्यरत असणाऱ्या या कक्षाचा एकप्रकारे मुंबईवर 'वॉच'असतो.या कक्षाचे कामकाज पाहून छत्रपती संभाजी नगर महापालिकेचे अधिकारी अवाक झाले.

अशा प्रकारचा कक्ष छत्रपती संभाजी नगर पालिकेत उभारण्याबाबत त्यांनी उत्सुकता दाखवली. आपत्कालीन कक्षाची उभारणी, विविध संसाधने, आपत्कालीन परिस्थितीवेळी करावयाच्या विविध उपाययोजना यासंबंधी माहिती घेण्याच्या उद्देशाने या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेतील आपत्कालीन नियंत्रण कक्षास आज भेट दिली. विविध आपत्तींची जोखीम कमी करणे, उपाययोजना आणि अंमलबजावणीचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिका ही आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार समन्वय यंत्रणा (नोडल एजन्सी) म्हणून कार्य करत आहे.

पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षामध्ये मुंबईतील सुमारे दहा हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी व्हिडिओ वॉल; राज्य तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एसडीआरएफ, एनडीआरएफ), लष्कर, तटरक्षक दल, रेल्वे आदी यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी हॉटलाइन, नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी मदतसेवा यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पालिकेतही आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या उद्देशाने येथील उप आयुक्त अंकुश पंधारे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख स्वप्निल सरदार, नियंत्रण अधिकारी (शिक्षण) गणेश दांडगे यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षास भेट दिली.

पालिकेचे संचालक (आपत्कालीन व्यवस्थान विभाग) महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन विभाग) रश्मी लोखंडे यांनी या अधिकाऱ्यांना विविध आपत्ती, उपाययोजना, आवश्यक संसाधने आदींबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्ष उभारणीसाठी लागणारे मनुष्यबळ, तंत्रज्ञान तसेच अन्य संसाधने आदींविषयीसुद्धा मार्गदर्शन केले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका