मुंबई : किल्ले रायगडाच्या संवर्धानचे काम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहे. रायगड संवर्धनाची काही कामे सुरळीत सुरु आहेत. मात्र, रायगड किल्ल्यावर परवानगी नसताना देखील रोप-वेचे काम सुरु असून महाड ते रायगड किल्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. यासंदर्भात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.
मागील वेळी सरकारने रायगड संवर्धनासाठी 706 कोटी रुपये दिले. रायगड ही शिवाजी महाराजांची राजधानी आहे. मात्र, याच राजधानीच्या विकासासाठी निधी मंजूर होऊन 2 वर्षे झाले, तरीही गडाचे काम 1 टक्काही झाले नाही. या कामासाठी 16.50 टक्के कमिशन दिले जाणार आहे. म्हणजेच शिवभक्तांचे 23 कोटी रुपये दलाली द्यायची का? असा सवाल संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर केला.
आज मुख्यमंत्र्यांना भेटून मी माझी अस्वस्था त्यांना सांगितली. तसेच, असे काम होणार असेल तर मला या जबाबदारीमधून मुक्त करा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला रायगड संवर्धनाचे काम तुम्हीच करा. हे काम तुमच्याशिवाय दुसरे कुणी करू शकणार नाही, असे सांगितले.
याशिवाय, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपण संबंधित सर्वांना एकत्र बोलावून बैठक घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करु. तसेच, भ्रष्टाचार होत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. याचबरोबर, सारथी संस्थेची स्वायत्तता आणि सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणचा लढा याबाबतही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.
आक्षेप काय?रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले की, रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाला आहे. तसेच रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणारी कामं पुरातत्व विभागाकडून रोखली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. रोप-वे चा मनमानी कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देखील संभाजीराजे यांनी दिला आहे.