मुंबई - छत्रपती संभाजीराजे आझाद मैदानातील मांडवात गादी टाकून झोपल्याचे फोटो, मोबाईल हातात घेऊन पाहतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यासह, माझा राजा उपाशी... अशा कॅप्शनने हे फोटो शेअर होत आहेत. ज्यांच्या पूर्वजांनी आरक्षण दिलं, त्या गादीचे वारसदार आज आरक्षणासाठी आझाद मैदानावर बसल्याने अनेकांनी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर, सरकारमधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजीराजेंची भेट घेतली होती. आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी आंदोलनस्थळी भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण सोडलं आहे. यावेळी, आपण ठेवलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.
गृहमंत्री वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र, संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमलबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले होते. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना वळसेपाटील यांन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं. आज, मुख्यमंत्र्यांच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर, संभाजीराजेंनी ज्युस घेऊन उपोषण सोडले.
दरम्यान, राज्य शासनाच्या बाजूने जे जे करू शकतो ते करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपले जे मुद्दे होते त्यात निर्णय झाल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनाही काळजी आहे, काही कायदेशीर बाबी आहेत, साधक बाधक चर्चा झाली. सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं शिंदेंनी म्हटलं.