Sambhajiraje: संभाजीराजेंनी मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार, तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 04:00 PM2022-08-26T16:00:20+5:302022-08-26T16:17:30+5:30

संभाजीराजेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे.

Sambhajiraje: Sambhaji Raje thanked Chief Minister Shinde and criticized Uddhav Thackeray of shiv sena | Sambhajiraje: संभाजीराजेंनी मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार, तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला

Sambhajiraje: संभाजीराजेंनी मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार, तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला

Next

मुंबई - माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षण आणि मराठा युवकांच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण केले होते. त्यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच, आपल्या मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्वासनही दिले होते. आता, संभाजीराजेंनी त्याच उपोषणातील फोटो शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लोटाही लगावला. 

संभाजीराजेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये, एकनाथ शिंदेंनी मराठा समाजातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गातून नोकरी देत आपला शब्द पाळला, असे म्हटले. तसेच, शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत. 
आपल्या लढ्याला यश... शासकीय नोकऱ्यांमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर माझे उपोषण सोडविताना दिलेले आश्वासन पाळले, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !, अशा आशयाने संभाजीराजेंनी पोस्ट लिहीली आहे. 

संभाजीराजेंची संपूर्ण पोस्ट

मराठा आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोरोना महामारीमुळे शासनाने नियुक्तीपत्रे देण्यास विलंब केला व दरम्यान ९ सप्टेंबर २०२० रोजी दुर्दैवाने मराठा आरक्षणास स्थगिती आली. त्यामुळे नंतरच्या काळातही शासनाने या उमेदवारांना नियुक्ती दिली नाही. 

वस्तुतः कोरोना महामारीमुळे नियुक्ती देण्यास शासनाला शक्य झाले नाही, यामध्ये या निवड झालेल्या उमेदवारांचा काहीही दोष नव्हता. त्यामुळे, जीवापाड मेहनत करून मिळवलेली त्यांची हक्काची नोकरी त्यांना मिळायलाच पाहिजे होती. यासाठी या सर्व उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकरिता कायदेशीर पद्धत म्हणून अधिसंख्य जागा निर्माण करण्याची संकल्पना सर्वप्रथम आम्ही पुढे आणली. ही संकल्पना समाजाची मागणी म्हणून आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दि. २९ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत मांडली व पुढेही वारंवार त्यासाठीचा पाठपुरावा केला. कोल्हापूर येथील मूक आंदोलनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकारसोबत दि. १७ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत हा मुद्दा आम्ही मांडला असता त्यांनी यावर निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांचा वेळ मागितला. मात्र, महिना उलटून गेला तरी त्या सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. म्हणून आम्ही नाशिक, नांदेड, रायगड, सोलापूर येथे आंदोलन केले, दौरे केले. मात्र तब्बल आठ महिने सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. 

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ४ महिने अंमलबजावणी केलीच नाही

सर्व उमेदवार मात्र वेळोवेळी मला भेटून त्यांच्या व्यथा सांगत होते. अपेक्षा व्यक्त करीत होते. शेवटी सरकारला जागे करण्यासाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये आझाद मैदान येथे मी स्वतः आमरण उपोषणाला बसलो. यावेळी, राज्य सरकार सोबत समन्वयकांची बैठक झाली असता, नियुक्त्यांच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चालढकल करीत होते. मात्र बैठकीत हा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडल्याने त्याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार व नामदार एकनाथ शिंदे यांनी याविषयी सकारात्मकता दर्शवली. स्वतः नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊन या मराठा उमेदवारांना आम्ही सुचविलेल्या पद्धतीनुसार अधिसंख्य जागा निर्माण करून नियुक्त्या देऊ, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र तरीही पुढचे चार महिने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. 

यानंतर स्वतः एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागील सरकारमध्ये असताना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना आठवण करून देऊन, नैतिक जबाबदारी म्हणून या आश्वासनांची पूर्तता करावी, असे निवेदन दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन त्यांनाही हा विषय समजावून देऊन, या उमेदवारांना त्यांचा न्याय द्यावा, अशी मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अधिसंख्य जागा निर्माण करून मराठा उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्व उमेदवार व समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेसह महाराष्ट्र विधीमंडळ व राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन !
 

Web Title: Sambhajiraje: Sambhaji Raje thanked Chief Minister Shinde and criticized Uddhav Thackeray of shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.