Sambhajiraje: "संभाजीराजेंचं स्क्रीन उपोषण, आझाद मैदानावर व्हॅनिटी कार कशासाठी?"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 07:16 PM2022-03-03T19:16:40+5:302022-03-03T19:17:18+5:30
खासदार संभाजी भोसलेंच्या खासदारकीची टर्म जून महिन्यात संपत आहे. ते संभाजी भोसले व्हॅनिटी कार घेऊन आझाद मैदानात बसतात
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आणि सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुंबईतील आझाद मैदानावर अडीच दिवस आमरण उपोषण केलं. या आंदोलनास पाठिंबा देत अनेकांनी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर, सरकारमधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी आंदोलनस्थळी भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण सोडलं आहे. यावेळी, आपण ठेवलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. मात्र, संभाजीराजेंचं आंदोलन हे स्क्रीन आंदोलन असल्याची टीका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
खासदार संभाजी भोसलेंच्या खासदारकीची टर्म जून महिन्यात संपत आहे. ते संभाजी भोसले व्हॅनिटी कार घेऊन आझाद मैदानात बसतात. ज्यावेळेस माणूस आत्मक्लेष एकत्रित करुन, चिंतनासाठी बसतो, त्यावेळेस व्हॅनिटी कार घेऊन बसत नाही. आम्हाला कधी त्याची गरज पडली नाही, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतही कधी व्हॅनिटी कार मी पाहिल्या नाहीत, असे म्हणत संभाजीराजेंच्या उपोषणावर एसटी कामगारांचे वकिल अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी टीका केली. दिल्लीची सत्तापलट करणाऱ्या आंदोनलातसुद्ध कधी अशा लक्झरी पाहिल्या नाहीत. केजरीवालांनी दिल्लीत सत्तापालट केलं, त्या आंदोलनातही व्हॅनिटी कार नव्हती, असे सदावर्तेंनी सांगितलं.
एका बाजूला आझाद मैदानावर आमचे कष्टकरी बसलेले आहेत. दुसऱ्या बाजुला स्क्रीनवरुन, स्क्रीन आंदोलन सुरू होतं. कारण, शाहरुख खानचं किंवा सलमान खानचं शुटींग होतं ना, तेव्हा व्हॅनिटी कार असते. या शुटींगनंतर स्क्रीन तयार केली जाते. स्क्रीनमध्ये दिसणाऱ्या टाईपचं आंदोलन उभा करायचं, मग मराठ्यांचे सगळे मंत्री पिच्चरटाईप भेटायला जातात. कधी न दिले जाऊ शकतात, अशा प्रकारचे आश्वासन दिले जातात. दुसऱ्या बाजुला 95 ते 97 भगिनी विधवा झालेल्या आहेत, त्यांच्या वेदना तिन्ही मराठा मंत्र्यांना दिसत नाहीत. कारण, ते जातीवर चालणार सगळं झालंय, असे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री अतिरेक्यंसाठी झुलणार का?
सरकारला कष्टकऱ्यांबाबतीत संवेदना नाहीत, पण दाऊद इब्राहीमच्या माणसांसोबत तुमचं जमतंय. त्यांसाठी, तुम्ही उतावीळ झालात, असे म्हणत सदावर्ते यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव तुम्ही कष्टकऱ्यांसाठी आहात, की 1993 च्या बॉम्बस्फोटातील अतिरेक्यांसाठी झुलणार आहात. तुम्ही कष्टकरी कामगारांना विलिनीकरण देणार आहात का, यासाठी सामान्य शाखेतील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे डोळे लावून बसलेला आहे, असेही सदावर्तेंनी म्हटले.
संभाजीराजेंचे फोटो व्हायरल
छत्रपती संभाजीराजे आझाद मैदानातील मांडवात गादी टाकून झोपल्याचे फोटो, मोबाईल हातात घेऊन पाहतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यासह, माझा राजा उपाशी... अशा कॅप्शनने हे फोटो शेअर होत आहेत. ज्यांच्या पूर्वजांनी आरक्षण दिलं, त्या गादीचे वारसदार आज आरक्षणासाठी आझाद मैदानावर बसल्याने अनेकांनी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर, सरकारमधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजीराजेंची भेट घेतली होती. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी आंदोलनस्थळी भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण सोडलं आहे. यावेळी, आपण ठेवलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.