मुंबई - राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार आणि छत्रपती संभाजीराजे आझाद मैदानातील मांडवात गादी टाकून झोपल्याचे फोटो, मोबाईल हातात घेऊन पाहतानाचे फोटो व्हायरल झाले होते. यासह, माझा राजा उपाशी... अशा कॅप्शनने हे फोटो शेअर होत आहेत. ज्यांच्या पूर्वजांनी आरक्षण दिलं, त्या गादीचे वारसदार आज आरक्षणासाठी आझाद मैदानावर बसल्याने अनेकांनी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. संभाजीराजेंच्या उपोषणाला मोठा प्रतिसाद राज्यभरातून मिळाला. त्यानंतर, आज उपस्थितांचे आभार मानताना संभाजीराजेंच्या डोळ्यात अश्रू तरळले. दरम्यान, सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजेंनी आज उपोषण सोडल्याची घोषणा केली.
आपण सर्वजण इथे आलात, मनापासून आपला सर्वांचा ऋणी आहे, छत्रपती कधीही रडत नाहीत, असे म्हणताच छत्रपती संभाजीराजेंच्या डोळ्यात पाणी आले. त्यावेळी, डाव्या हाताच्या बाह्यांनी त्यांनी डोळ्यातील अश्रू पोहोचले. संभाजीरांजेचा तो क्षण पाहताना आझाद मैदानातील वातावरण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, संभाजीराजे तुम आगे बढो... एक मराठा, लाख मराठा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आझाद मैदानावर जमलेल्या वारकरी संप्रदायाचे आभार मानताना, संभाजीराजे भावूक झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना संत तुकोबांनी, वारकरी संप्रदायाने जी ताकद दिली होती, ती ताकद देण्यासाठी आपण इथे आलात, मी मनापासून आपला ऋणी आहे. छत्रपतींच्या डोळ्यात केव्हा अश्रू नसतात, पण वारकरी संप्रदायापुढे नतमस्तक होण्यासाठी होते. तुमची भक्ती आणि आमची शक्ती जेव्हा एकत्र येईल, तेव्हाच स्वराज्य निर्माण होतं. आपण, पुन्हा एकदा शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं सर्वच महापुरुषांचं स्वराज्य पुन्हा निर्माण करूयात, असे संभाजीराजेंनी यावेळी म्हटले.
गृहमंत्र्यांनी घेतली होती भेट
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना वळसेपाटील यांन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार, आज चर्चा झाल्याची माहिती आहे.